![]()
राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवीन बायपासवर भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर ट्रकने दुचाकीला भीषण धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी सकाळी घडला. शुभम रमेश दिवनाले (३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम दिवनाले हे एका खासगी कंपनीत रोजंदारीवर काम करत होते. बुधवारी सकाळच्या सुमारास आपले काम आटोपून ते दुचाकी क्रमांक एमएच ३० सीसी ४५६० ने घराकडे परत येत होते. बोरगाव मंजू नवीन बायपासवरील डी. के. हॉटेल चौकात आले असता, अकोल्याकडून मूर्तिजापूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर क्रमांक आरजे ०४ जीबी ३२३५ ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की शुभम दिवनाले हे गंभीर जखमी होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुनील वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रमोद डोईफोडे यांच्यासह पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात रवाना केला. या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिस पुढील तपास करत आहेत. राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होऊन दोन वर्षे उलटली तरी बोरगाव मंजू नवीन बायपासवरील डी. के. हॉटेल चौकात अपघातांची मालिका थांबलेली नाही. हा ब्लॅक पॉइंट अत्यंत धोकादायक ठरत असून सतत होणाऱ्या अपघातांमुळे वाहनधारक व स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला होत आहे. सदोष रस्ते बांधणीने अपघात महामार्ग ५३ वर बोरगाव मंजू चौकातील ‘एनएचएआय’ने रस्ता एका बाजूला टेकडं व एका बाजूला चढ असा उंच-सखल बनवला आहे. त्यामुळे वाहनांचे नियंत्रण सुटून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपघातांवर कायमस्वरूपी नियंत्रणासह नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी चौकात अंडरपास बनवणे आवश्यक आहे.
Source link
कंटेनरने दुचाकीला चिरडले; तरुण ठार:महामार्गावरील ‘डी. के. हॉटेल चौक’ ठरतोय मृत्यूचा सापळा