![]()
कळमनुरी तालुक्यातील खरवड शिवारात पत्नीच्या माहेरी जाऊन मारहाण करून खून केला तसेच सासूला मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली असून या घटनेनंतर पतीनेही गळाफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी गुरुवारी ता. 15 कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील खरवड येथील दीपाली पाईकराव यांचा विवाह काही वर्षापुर्वी धानोरा जहांगिर (ता.कळमनुरी) येथील विशाल डोंगरे याच्या सोबत झाला होता. विवाहा नंतर काही दिवस चांगले वागविल्यानंतर विशाल याने दीपाली यांना त्रास देण्यास सुरवात केली होती. त्यामुळे त्या त्रस्त झाल्या होत्या. मागील काही दिवसांपासून त्या माहेरी खरवड येथे आई, वडिलांकडे शेतात राहण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान, बुधवारी ता. 14 सायंकाळच्या सुमारास विशाल हा त्याच्या सासुरवाडीला खरवड येथे गेला. यावेळी घरी त्याची पत्नी दीपाली व सासू कमलबाई ह्या दोघीच होत्या. यावेळी विशाल व दीपाली यांच्यात वाद सुरु झाला. शाब्दीक चकमकीनंतर विशाल याने तु माझ्या सोबत येण्या ऐवजी माहेरी खरवड येथे का आली या कारणावरून बाजेच्या लाकडी ठाव्याने मारहाण करण्यास सुरवात केली. या मारहाणीत दीपाली यांचा मृत्यू झाला. तर सदर भांडण सोडवितांना विशाल याने त्याची सासू कमलबाई यांनाही मारहाण करून गंभीर जखमी केले. दरम्यान, काही वेळानंतर कमलबाई यांचे पती व मुलगा शेतात आल्यानंतर त्यांना हा प्रकार दिसून आला. त्यांनी कमलबाई यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले अन थेट पोलिस ठाणे गाठून माहिती दिली. पोलिस उपाधिक्षक एन. एस. देशमुख, उपाधिक्षक मयुर रसाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक रघुनाथ शेवाळे, उपनिरीक्षक मदन गव्हाणे, विकास आडे, जमादार गजानन होळकर, लक्ष्मीकांत माखणे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळापासून काही अंतरावरच विशाल यानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. या प्रकरणी कमलबाई यांच्या तक्रारीवरून विशाल याच्या विरुध्द खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपाधिक्षक मयुर रसाळ पुढील तपास करीत आहेत.
Source link
हिंगोली हादरली:पत्नीचा खून करून पतीनेही संपवले जीवन; सासू गंभीर जखमी, कळमनुरी तालुक्यातील खरवड शिवारातील घटना