Headlines

विरोधकांचे आंदोलन पेड आणि विदेशी रिमोट कंट्रोलवर:विद्यार्थ्यांना रोज 3 हजार देऊन गर्दी जमवली जातेय; भाजपचे कुंवर बासित अली यांचा आरोप




“देशाचे माजी राष्ट्रपती, महान वैज्ञानिक भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी अखेरच्या श्वासापर्यंत देशाच्या प्रगतीचा आणि ‘विकसित भारत 2047’ चा ध्यास घेतला होता. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश त्याच मार्गावर वेगाने पुढे जात असताना, काही देशविरोधी शक्ती विदेशी ताकदींच्या इशाऱ्यावर देशात अस्थिरता निर्माण करण्याचे षड्यंत्र रचत आहेत. विरोधकांनी सुरू केलेली आंदोलने ही नैसर्गिक नसून पूर्णपणे पेड आहेत. विद्यार्थ्यांना आणि सामान्य नागरिकांना संविधानाच्या नावाखाली भडकवून रोज तीन हजार रुपये वाटून रस्त्यावर आणले जात आहे. मात्र, देश अशा कारस्थानांना भीक घालणार नाही,” असा खळबळजनक आणि घणाघाती आरोप भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष कुंवर बासित अली यांनी केला आहे. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप अल्पसंख्याक मोर्चा मुंबईचे अध्यक्ष वसीम खान आणि पक्षाचे सह-माध्यम प्रमुख ओमप्रकाश चौहान उपस्थित होते. अल्पसंख्याक मोर्चा खंबीरपणे मोदींसोबत! डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करताना कुंवर बासित अली म्हणाले, “डॉ. कलाम साहेबांनी देशातील तरुणांना, विद्यार्थ्यांना मोठे स्वप्न पाहण्याची प्रेरणा दिली. व्यासपीठावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे संपूर्ण जीवन देशाच्या प्रगतीसाठी समर्पित होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा ‘वी विल डू इट’ म्हणतात, तेव्हा ते स्वतःला डॉ. कलामांच्या याच राष्ट्रनिष्ठा आणि विचारसरणीशी जोडतात.” “संरक्षण क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, परराष्ट्र धोरण आणि महिला सक्षमीकरण या सर्वच आघाड्यांवर आज भारत जगात आत्मनिर्भर आणि शक्तिशाली बनत आहे. भाजप अल्पसंख्याक मोर्चा डॉ. कलामांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी आणि भारताला पुन्हा विश्वगुरू बनवण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.” आंदोलने पेड; विद्यार्थ्यांना 3 हजार रुपये देऊन आणले देशभरात विरोधकांकडून लोकशाही आणि संविधानाच्या नावाखाली सुरू असलेल्या आंदोलनांची पोलखोल करताना ते म्हणाले, “या आंदोलनामागील सूत्रधारांचे धागेदोरे थेट परदेशांशी जोडलेले आहेत. हे कोणतेही स्वयंस्फूर्त आंदोलन नाही, तर लोकांची दिशाभूल करून देशाच्या विरोधात उभे करण्याचे पूर्वनियोजित षड्यंत्र आहे. काही विद्यार्थी आंदोलकांनी स्वतः सांगितले आहे की, त्यांना दररोज तब्बल ३ हजार रुपये देऊन आंदोलनस्थळी बोलावले जाते. देशातील सुशिक्षित विद्यार्थी कधीही देशाविरोधात जाऊ शकत नाहीत; परंतु त्यांना खोटे नरेटिव्ह सांगून तात्पुरते भरकटवले जात आहे.” बांगलादेशी मॉडेलचे अनुकरण “आंदोलनातील प्रमुख चेहऱ्यांपैकी असणाऱ्या नेहा वोरा या बांगलादेशचे गोडवे गातात. ज्या पाकिस्तान आणि बांगलादेशने भारतात सातत्याने दहशतवादाला खतपाणी घातले, त्यांना आदर्श मानणाऱ्या लोकांच्या हातात आंदोलनाची सूत्रे आहेत. बनावट नोटा आणि दहशतवादाच्या जोरावर जे भारताला रोखू शकले नाहीत, ते आता अशा छुपे मार्गाने देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत.” अमेरिकन नागरिकाचा सहभाग आणि संशयास्पद चेहरे! आंदोलनातील आंतरराष्ट्रीय कनेक्शनवर बोट ठेवताना बासित अली यांनी धक्कादायक खुलासे केले, “या संपूर्ण आंदोलनात राहुल गांधी, अभिजित दीपके, नेहा वोरा आणि इमरान हे चार चेहरे प्रामुख्याने दिसत आहेत. यातील कोणाचा संबंध इटलीशी आहे, तर कोणाचा थेट अमेरिकेशी जोडलेला आहे. हे आंदोलन कोणाच्या रिमोट कंट्रोलवर चालते, हे संपूर्ण देश उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.” मुंबई पोलिसांची कारवाई व परदेशी आंदोलक “मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनात एका अमेरिकन नागरिकाचा थेट सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्याला मुंबई पोलिसांनी नोटीस बजावून येत्या 28 ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, आंदोलक जी स्केलेटनची (सांगाड्याची) टी-शर्ट घालून फिरत आहेत, अगदी तसाच पॅटर्न यापूर्वी नेपाळ आणि इंडोनेशियातील आंदोलनांमध्ये राबवला गेला होता. त्यामुळे हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील कटकारस्थान असल्याचे स्पष्ट होते. या आंदोलनात आपलेच तरुण आणि नागरिक समोर असल्याने पोलीस यंत्रणा आणि सीआरपीएफ अत्यंत संयमाने आणि समजूतदारपणे परिस्थिती हाताळत आहेत.” घोटाळेबाज विरोधकांना पुढील 50 वर्षे सत्तेत येण्याची संधी नाही! विरोधकांच्या 13 पक्षांच्या आघाडीवर (इंडिया आघाडी) जोरदार प्रहार करताना ते म्हणाले, “काँग्रेसच्या काळात टू-जी स्पेक्ट्रम, कोलगेटसारखे महाघोटाळे झाले. मात्र, गेल्या १२ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विरोधक भ्रष्टाचाराचा एकही आरोप लावू शकलेले नाहीत. मोदींच्या काळात विरोधकांच्या नेत्यांकडे हजारो कोटींची बेनामी संपत्ती जप्त होत आहे, त्यांची भ्रष्टाचाराची दुकाने बंद झाली आहेत. म्हणूनच स्वतःच्या तिजोऱ्या भरण्याची संधी न मिळाल्याने विरोधकांच्या पोटात मळमळ सुरू झाली आहे.” जनता मोदींसोबत ठाम “विद्यापीठ निवडणुकांमध्ये तरुणांनी आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये ‘जेन-झी’ (Gen-Z) पिढीने भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ हाच मोदींचा मंत्र आहे. जनता विरोधकांच्या या दंगली घडवण्याच्या आणि रस्ते अडवण्याच्या राजकारणाला थारा देणार नाही. ज्याप्रमाणे अनेक राज्यांतून काँग्रेस २५-३० वर्षांपासून हद्दपार झाली आहे, तसेच येत्या ५० वर्षांपर्यंत जनतेने काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्धार केला आहे,” असा सणसणीत टोला कुंवर बासित अली यांनी शेवटी लगावला. —————————————————————– हेही वाचा… 5 हजारात दिवाळी साजरी करून दाखवा, 1 हजार बक्षीस देईन: दुष्काळी मदतीवरून अंबादास दानवेंचे सरकारला आव्हान राज्य शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी जाहीर केलेल्या 5 हजार रुपयांच्या अग्रीम (आगाऊ) मदतीवरून आता राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीका करत, सरकारला खुले आव्हान दिले आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी सांगावे, त्या मंत्र्याच्या खात्यात आम्ही 5 हजार रुपये जमा करतो, त्यांनी यात दिवाळी साजरी करून दाखवावी’, असे थेट चॅलेंज दानवे यांनी दिले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *