![]()
परदेशात वास्तव्यास असलेल्या नातेवाइकांनाही दिवाळीच्या फराळाचा गोडवा अनुभवता यावा, यासाठी पुणे टपाल विभाग सज्ज झाला आहे. दिवाळीनिमित्त फराळाचे पदार्थ नाममात्र दरात पॅक करून माफक शुल्कात परदेशात पाठवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यंदा विशेष म्हणजे, नागरिकांना टपाल कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही. पोस्टमन घरी येऊन फराळाचे पार्सल विनामूल्य घेऊन जाणार आहेत. दिवाळीपर्यंत ही घरपोच संकलन सुविधा उपलब्ध असेल, अशी माहिती पुणे क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल प्रीती अग्रवाल यांनी दिली. पुणे पोस्ट कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अग्रवाल यांनी या उपक्रमाची माहिती दिली. नोकरी आणि शिक्षणासाठी पुण्यातून परदेशात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, परदेशात राहणाऱ्या अनेकांना दिवाळीच्या सणासाठी भारतात येणे शक्य होत नाही. अशा नागरिकांना घरगुती फराळ आणि भेटवस्तू पाठवता याव्यात, यासाठी टपाल विभागाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शहरातील टपाल कार्यालयांमध्ये फराळाचे पदार्थ पॅकिंग करण्याची आणि ते परदेशात पाठवण्याची सोय करण्यात आली आहे. दिवाळीचा फराळ तयार असूनही तो पाठवण्यासाठी वेळ मिळत नसलेल्या नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. घरातूनच पार्सल संकलित केले जाणार असल्याने नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत. पुणे टपाल विभागाने गेल्या वर्षी दिवाळीनिमित्त तब्बल २१ हजार किलो फराळ परदेशात पाठवला होता. हा फराळ वेळेत नातेवाइकांपर्यंत पोहोचवण्यात आला होता. यंदाही अधिकाधिक नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता यावा, यासाठी विभागाने तयारी केली आहे. परदेशातील आप्तेष्टांना दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.
Source link
पोस्टाची घरपोच सेवा, परदेशात फराळ पाठवणे झाले सोपे:दिवाळीपर्यंत विनामूल्य पार्सल संकलन, नाममात्र दरात पॅकिंग आणि पाठवण्याची सुविधा