Headlines

नांदर येथे श्री रेणुकादेवी मंदिरात 15 हजार भाविकांनी घेतले दर्शन:विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, पाचव्या माळेपासून गर्दी वाढणार‎


.

पैठण तालुक्यातील नांदर येथील श्री रेणुकादेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास रविवारी घटस्थापनेने भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. या पावन पर्वावर देवीच्या दर्शनासाठी केवळ स्थानिक परिसरातूनच नव्हे, तर संपूर्ण राज्यभरातून हजारो भाविकांची गर्दी उसळत आहे. नवरात्रोत्सवाच्या चार दिवसांत १५ हजार भाविकांनी दर्शन घेऊन महाआरतीचा लाभ घेतला.

नांदर येथील रेणुकादेवी मंदिराला पौराणिक व आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे. एका जुन्या आख्यायिकेनुसार, नांदर येथील एक निष्ठावंत वैद्य नित्यनेमाने श्री रेणुकादेवीच्या दर्शनासाठी माहूरगडावर जात असत. मात्र, वृद्धापकाळामुळे त्यांना माहूरगडाची कठीण वारी करणे अशक्य झाले. त्यामुळे त्यांनी माहूरगडावरच अन्नपाण्याचा त्याग करून देवीची कठोर आराधना केली. वैद्यांच्या या निस्सीम भक्तीवर प्रसन्न होऊन रेणुकामातेने त्यांना दर्शन दिले. वैद्यांनी देवीला आपल्या नंदीग्राम अर्थात नांदर गावी येण्याची विनंती केली. देवीने ती विनंती मान्य केली, परंतु एक अट घातली. मला चिपाटाच्या गाडीवर बसवून ती गाडी तुम्हाला ओढत न्यावी लागेल, परंतु रस्त्यात जिथे तुम्ही शंका घेऊन मागे वळून पाहाल, तिथेच मी कायमची स्थिर राहीन. वैद्यांनी देवीची अट श्रद्धेने मान्य केली आणि गाडी ओढण्यास सुरुवात केली. गावापासून तीन किलोमीटर अंतरावर आल्यावर वैद्यांना देवी खरोखर गाडीत आहे की नाही, अशी शंका आली आणि त्यांनी मागे वळून पाहिले. त्याच क्षणी देवी अदृश्य झाली. हे ठिकाण गावापासून दूर असल्याने वैद्यांना पश्चात्ताप झाल्याचे आख्यायिकेत सांगितले आहे. त्यांनी पुन्हा तीन दिवस व तीन रात्री अन्नपाण्याविना देवीची आराधना केली. त्यांच्या या तपाने प्रसन्न होऊन देवीने स्वप्नात दृष्टांत दिला, मी आता प्रत्यक्ष सोबत येणार नाही. गावाबाहेर मी सांगते त्या ठिकाणी खोदकाम करा, तेथे माझी स्वयंभू मूर्ती सापडेल. त्याप्रमाणे वैद्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने तेथे खोदकाम केले असता देवीची अतिशय सुंदर शेंदूरवर्णी स्वयंभू मूर्ती सापडली. पुढे संपूर्ण ग्रामस्थांनी एकत्र येऊन त्या मूर्तीची विधिवत आणि भक्तिभावाने प्राणप्रतिष्ठा केली. दरम्यान, नवरात्रोत्सवात याठिकाणी विविध कार्यक्रम पार पडतात.

प्राचीन काळी नंदीग्राम नावाने प्रसिद्ध नांदर हे गाव प्राचीन काळी नंदीग्राम या नावाने प्रसिद्ध होते. प्रभू श्रीरामचंद्र लंका दहन करून अयोध्येला परत जात असताना, या भागातील राजा वीरभद्र यांच्या आग्रहाच्या विनंतीवरून त्यांनी येथे काही काळ मुक्काम केला होता. रामचंद्रांनी राजा वीरभद्राच्या भक्तीवर प्रसन्न होऊन या भागातील नदीला त्याच्या नावावरून वीरभद्रा नदी असे नाव दिले. या घटनेचा उल्लेख संत एकनाथ महाराज यांच्या भागवत कथेतही आढळतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *