![]()
लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या आणि अचानक मानधन बंद झालेल्या महिलांनी गुरुवारी अकोले शहरात मोर्चा काढला. मानधन तातडीने सुरू करा, ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करा आणि दरमहा १,५०० रुपयांऐवजी २,१०० रुपये द्या, अशा मागण्या अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने केल्या. तहसीलदार सिद्धार्थ मोरे आणि महिला व बालविकास अधिकारी केडर नागरे यांना निवेदन देण्यात आले. मानधन पुन्हा सुरू करण्यासाठी अनेक महिलांनी अर्जही दाखल केले. महात्मा फुले चौकातून सुरू झालेला मोर्चा मुख्य मार्गावरून घोषणाबाजी करत तहसील कार्यालयावर धडकला. लाल बावटे आणि संघटनेचे झेंडे हातात घेत ग्रामीण, आदिवासी व शेतमजूर महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. मोर्चाचे नेतृत्व संघटनेच्या राज्य सचिव प्राची हतीवलेकर आणि सहसचिव प्रीती शेखर यांनी केले. माकपचे राज्य सचिव डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ आणि गणेश ताजणे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. सुमन विरणक, अनिता साबळे, संगीता साळवे, आराधना बोऱ्हाडे, निर्मला मांगे आणि हेमलता शेळके यांनी मोर्चाचे संयोजन केले. महिला घर, शेती, पशुपालन आणि कुटुंबासाठी विनामोबदला श्रम करतात. भारतीय स्टेट बँकेच्या संशोधनानुसार या श्रमांचे वार्षिक मूल्य २२.७ लाख कोटी रुपये असल्याचा दाखला देत, मानधन म्हणजे सरकारी दया नसून महिलांच्या श्रममूल्याची अंशतः परतफेड असल्याची भूमिका संघटनेने मांडली. निराधार, विधवा, वृद्ध आणि श्रमिक महिलांना योजनेतून वगळू नये, १८ वर्षे पूर्ण केलेल्या तसेच ६५ वर्षांवरील पात्र महिलांना लाभ द्यावा आणि थकीत रक्कम व्याजासह द्यावी, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या. उर्वरित अर्ज २२ ऑक्टोबर रोजी दाखल करणार असल्याचे संघटनेने सांगितले. मानधन बंद पडले? हे तपासा लाभ मिळण्याची पद्धत : रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे बँक खात्यात जमा होते. मानधन थांबण्याची संभाव्य कारणे : ई-केवायसीतील त्रुटी, आधार-बँक खाते जोडणीतील अडचणी किंवा पात्रतेच्या पडताळणीतील विसंगती. पुढील पाऊल : मानधन जमा न झाल्यास संबंधित कार्यालयात अर्जाची स्थिती व बँक खात्याशी संबंधित तपशील तपासून घ्यावेत. महिलांची मागणी : बंद मानधन पुन्हा सुरू करावे, ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करावी आणि मासिक लाभ २,१०० रुपये करावा.
Source link
१,५०० नव्हे, २,१०० रुपये द्या; ई-केवायसी पुन्हा सुरू करण्याचीकेली मागणी:नवरात्रीत ‘लाडक्या बहिणीं’चा दुर्गावतार; बंद मानधनासाठी तहसीलवर धडक मोर्चा, १,५०० नव्हे, २,१०० रुपये द्या; ई-केवायसी पुन्हा सुरू करण्याचीकेली मागणी