![]()
दौंड तालुक्यातील डाळिंब येथे भीमाशंकर धोंडीबा खंडाळे (वय ३५) यांच्या खुनाचा उलगडा करण्यात यवत पोलीस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. किरकोळ शिवीगाळीचा राग मनात धरून गळा दाबून खून केल्याचा आरोप असून, याप्रकरणी गावातील विजय सुभाष या ४० वर्षीय संशयिताला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमाशंकर हे ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास राहत्या घरातून बेपत्ता झाले होते. त्यांची आई नंदा धोंडीबा खंडाळे (वय ५१, व्यवसाय मजुरी) यांनी मुलाचे अज्ञात कारणासाठी अपहरण झाल्याची फिर्याद यवत पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. दरम्यान, ८ ऑक्टोबर रोजी डाळिंब गावच्या हद्दीतील सोमेश ढस्के यांच्या विहिरीत भीमाशंकर यांचा मृतदेह आढळला. त्यांचे हातपाय लोखंडी तारेने बांधलेले होते. मृतदेहाला मोठा दगडही बांधण्यात आला होता. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत टाकल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी खून आणि पुरावा नष्ट करण्यासंबंधीच्या कलमांचा समावेश केला. या प्रकरणाचा तपास सुरू असताना १५ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी संशयित विजयला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान भीमाशंकर यांनी किरकोळ शिवीगाळ केल्याने राग आल्याचे त्याने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच रागातून भीमाशंकर यांचा गळा दाबून खून केला आणि नंतर हातपाय तारेने बांधले. मृतदेहाला मोठा दगड बांधून तो विहिरीत फेकल्याची कबुली संशयिताने दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि यवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या पथकांनी संयुक्त तपास केला. सहायक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, पोलीस उपनिरीक्षक मारुती मेमाणे, अक्षय मोरे यांच्यासह दोन्ही पथकांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला. बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह सापडल्यानंतर तपासाला मिळालेल्या दिशेतून संशयितापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. अटक करण्यात आलेल्या संशयिताच्या चौकशीतून घटनेचा क्रम समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे करीत आहेत. —————– हेही वाचा.. लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरवर छापा; 20 जणांना अटक: परदेशी नागरिकांची फसवणूक करत होते, 36 लाख 41 हजारांचा मुद्देमाल जप्त
परदेशी नागरिकांची फसवणूक करण्यासाठी चालविल्या जाणाऱ्या बेकायदा कॉल सेंटरवर पुणे ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून 20 जणांना अटक केली. या कारवाईत मोबाईल, लॅपटॉप, रोकड आणि चारचाकी वाहन असा एकूण 36 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा शहर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. सविस्तर वाचा
Source link