Headlines

पाऊसच नाही तर चारा कुठून उगवणार?:5 हजार देऊन शेतकऱ्यांची चेष्टा करू नका; शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल, राज्य सरकारच्या तिजोरीवरच दुष्काळ!




“राज्यातील शेतकरी दुष्काळाने पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असताना, महायुती सरकारने जाहीर केलेली अवघ्या 5 हजार रुपयांची मदत म्हणजे बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा आणि त्यांना भीक दिल्यासारखा प्रकार आहे. एका बाजूला भीषण महागाईने उच्चांक गाठला आहे आणि दुसरीकडे संपूर्ण खरीप पीक वाया गेले आहे. अशा बिकट स्थितीत 5 हजार रुपयांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी साजरी होणार? मुख्यमंत्र्यांचे प्रवक्ते सोशल मीडियावरील जनतेच्या तीव्र प्रतिक्रिया लपवून निर्णयाचे गोडवे गात आहेत; मात्र प्रत्यक्षात हे सरकार सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा थांबवून प्रत्येक बाधित शेतकऱ्याला 1 लाख रुपये आणि शेतमजुरांना 25 हजार रुपयांची थेट आर्थिक मदत जाहीर करावी,” अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत शशिकांत शिंदे यांनी दुष्काळी धोरण, कर्जमाफीतील टप्पे, निवडणूक आयोगाची दडपशाही आणि पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या रणनीतीवर रोखठोक भाष्य केले. या पत्रकार परिषदेला काँग्रेस व महाविकास आघाडीचे स्थानिक पदाधिकारीही उपस्थित होते. पाऊसच नाही तर चारा कुठून येणार?; ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा! राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या दुष्काळी निर्णयांची पोलखोल करताना शशिकांत शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी रब्बी हंगामात शेतकऱ्यांना चारा पिके घेण्याचा सल्ला दिला आहे. मुळात जमिनीत ओलावा नाही, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे आणि पाऊसच पडलेला नाही, तर चारा कुठून उगवणार? जमिनीवरची वस्तुस्थिती न समजता मंत्रालयात बसून कागदी सल्ले दिले जात आहेत.” 5 हजार रुपयांनी काय होणार? “शेतकऱ्यांचे कुटुंब उभे राहावे यासाठी 25 हजार ते 50 हजार रुपयांची किमान तरतूद अपेक्षित होती. 5 हजारांनी कोणत्या शेतकऱ्याचा प्रश्न सुटणार आहे? आमची स्पष्ट मागणी आहे की, प्रत्येक शेतकऱ्याला प्रतिहेक्टर 1 लाख रुपये आणि शेतावर अवलंबून असणाऱ्या शेतमजुरांना प्रति कुटुंब 25 हजार रुपयांची मदत तात्काळ दिली पाहिजे.” शासनाच्या तिजोरीवरच दुष्काळ “सुरुवातीला 265 तालुके आणि अवघ्या आठवड्याभरात आणखी 40 तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले. एका आठवड्यात असा काय मोठा चमत्कार घडला? आधी सर्वेक्षण करून मग दुष्काळ जाहीर करण्याची शासकीय पद्धत आहे; मात्र इथे थेट घोषणा केल्या जात आहेत. मुळात राज्य सरकारच्या तिजोरीतच खडखडाट असून तिजोरीवरच दुष्काळ पडला आहे. त्यामुळेच सरसकट मदत देण्याऐवजी सरकार केवळ वेळकाढूपणा करत आहे.” सरसकट दुष्काळ आणि कर्जमाफीची गरज “उसाचा उतारा घटला आहे, कापूस-सोयाबीन हातचे गेले आहे. त्यामुळे आदरणीय शरद पवार साहेबांनी केलेल्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात सरसकट दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. कर्जमाफीचे टप्पे पाडण्याऐवजी संपूर्ण आणि सरसकट कर्जमाफी केली पाहिजे.” तिरंगा हातात घेणाऱ्या तरुणांना तिहार जेल दिल्लीतील विरोधकांचे आंदोलन आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला. “सर्वोच्च न्यायालयाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासंदर्भातील घडामोडींवर स्पष्ट भूमिका घेतली आहे. देशात ज्या पद्धतीने लोकशाहीची हत्या करून निवडणुका जिंकल्या जात आहेत, त्याविरोधात राहुल गांधी आणि ‘इंडिया’ आघाडी रस्त्यावर उतरली आहे. न्यायालयाने दखल घेतल्याने आता न्यायव्यवस्थेकडून जनतेला मोठ्या न्यायाची अपेक्षा आहे.” तरुणांवर पाळत आणि दडपशाही “हातात देशाचा तिरंगा घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्या तरुणांना पकडून थेट तिहार जेलमध्ये डांबले जात आहे. तरुण नेते अभिजित दीपके यांच्यावर पोलिसांमार्फत पाळत ठेवली जात आहे. लोकशाहीत विरोध करण्याचा अधिकार चिरडून टाकला जात आहे. शांततेत आंदोलन करणाऱ्या तरुणींवर पोलिसांच्या संरक्षणात हल्ले केले जात आहेत, हे अत्यंत लज्जास्पद असून जनतेचा हा असंतोष आता देशभरात ज्वालामुखीसारखा उसळेल.” व्यापाऱ्यांची गळचेपी “जीएसटी, जाचक करप्रणाली आणि आता डिजिटल व्यवहारांवरील करांमुळे देशातील छोटा-मोठा व्यापारी वर्ग पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. हुकूमशाहीविरोधातील या लढ्यात आता व्यापारी वर्गानेही एकत्र येणे काळाची गरज आहे.” विधान परिषदेत मविआचा आकडा वाढवणार पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या भूमिकेबाबत विचारले असता शिंदे यांनी स्पष्ट केले. “विधान परिषदेत महाविकास आघाडीचा एक-एक आमदार वाढवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. निवडणुकीत भाजप-महायुतीला पराभूत करू शकणाऱ्या सक्षम उमेदवाराच्या पाठीशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने उभे आहेत.” उद्धव ठाकरेंशी चर्चेतून मार्ग “जागावाटप आणि समन्वयाच्या संदर्भात येत्या दोन दिवसांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी प्रत्यक्ष बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली जाईल. पाचही मतदारसंघांत कोणताही विसंवाद राहणार नाही आणि महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकाच ताकदीने भाजपविरोधात लढतील,” असा ठाम विश्वास शशिकांत शिंदे यांनी शेवटी व्यक्त केला. ——————————————————— हेही वाचा… दुष्काळात बीडमध्ये 80 कोटींचा बोगस पशुधन घोटाळा: दिवाळीआधी हेक्टरी 1 लाख न दिल्यास मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर इशारा “महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये यंदा सरासरी 37 टक्क्यांपर्यंत पाऊस कमी झाला असून दुष्काळाने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. मात्र, या भीषण संकटातही शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवणारे भ्रष्ट लांडगे सत्तेच्या वळचणीला बसून तिजोरी लुटायला टपले आहेत. बीड जिल्ह्यात पशुधन योजना प्रत्यक्षात येण्यापूर्वीच ‘वैदेही ॲग्रो’ कंपनीच्या संचालकांनी शासनातील लोकांच्या संगनमताने तब्बल 80 कोटी रुपयांचे बोगस प्रस्ताव तयार केले होते. वेळीच तक्रारी झाल्याने हे प्रस्ताव रद्द करावे लागले, हा दुष्काळातील लांडगेगिरीचा जिवंत नमुना आहे. गुजरातला न मागता हजारो कोटींची मदत देणारे मोदी सरकार महाराष्ट्राला मात्र भीक मागायला लावत आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 1 लाख रुपयांची थेट मदत जाहीर केली नाही, तर राज्यात शेतकऱ्यांचा प्रचंड उद्रेक होईल आणि सत्ताधारी मंत्र्यांना रस्त्यावर फिरणे मुश्किल केले जाईल,” असा संतप्त व इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *