![]()
युवकांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाला ‘ज्ञानतीर्थ-२०२६’ या नावाने शुक्रवारपासून (दि. १६) उत्साहात प्रारंभ झाला. नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सायन्स कॉलेजच्या आयोजनातून होत असलेल्या या चार दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध मराठी सिनेअभिनेते भारत गणेशपुरे यांच्या हस्ते झाले. उद्घाटन सोहळ्याला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे, संस्थेचे अध्यक्ष प्रवीण पाटील, प्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे, अशोक महाजन, डॉ. पवार आदी मान्यवर उपस्थित होते. ‘मस्त जगा, मजेत जगा’; भारत गणेशपुरे यांचा युवकांना संदेश उद्घाटनप्रसंगी भारत गणेशपुरे यांनी अभिनय क्षेत्रातील विविध अनुभव आणि रंजक प्रसंग सांगत कलाविश्वातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. अभिनय ही केवळ मनोरंजनाची कला नसून निरीक्षण, अनुभव, अभिव्यक्ती आणि सादरीकरण यांचा सुंदर संगम असल्याचे त्यांनी आपल्या संवादातून स्पष्ट केले. आपल्या खास शैलीत युवक-युवतींशी संवाद साधताना त्यांनी ‘मस्त जगा, मजेत जगा’ असा उत्साहवर्धक संदेश दिला. त्यांच्या संवादामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ‘भविष्य घडविणे आपल्या हातात’- कुलगुरू डॉ. चासकर यांचे आवाहन कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील संधी, ज्ञानाचे महत्त्व आणि भविष्य घडविण्याची जबाबदारी यांची जाणीव करून दिली. कुठे आणि कोणत्या कुटुंबात जन्म घ्यावा किंवा आपला चेहरा कसा असावा, हे आपल्या हातात नसते; मात्र आपले भविष्य कसे घडवायचे, हे निश्चितपणे आपल्या हातात असते, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या ज्ञानाचा योग्य उपयोग करून स्वतःची क्षमता सिद्ध करावी. तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्रभावी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असलेली निवडणूकविषयक शपथ उपस्थितांना देण्यात आली. त्यामुळे सांस्कृतिक उपक्रमासोबतच लोकशाही मूल्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. विविध कलाप्रकारांतून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे दर्शन दि. १६ ते १९ ऑक्टोबरदरम्यान आयोजित या महोत्सवात संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य, चित्रकला आणि विविध सर्जनशील कलाप्रकारांतील स्पर्धांचा समावेश आहे. पहिल्या दिवशी पोवाडा, मूक अभिनय, भारतीय सुगम गायन, वक्तृत्व, कोलाज, व्यंगचित्रकला, फोक ऑर्केस्ट्रा, एकांकिका आणि पाश्चात्त्य सुगम गायन या कलाप्रकारांतील स्पर्धा झाल्या. दुसऱ्या दिवशी लावणी, विडंबन अभिनय, शास्त्रीय तालवाद्य, वक्तृत्व, स्थळ छायाचित्रण, मेहंदी, वादविवाद, शास्त्रीय सुरवाद्य, चित्रकला, पोस्टर पेंटिंग, कव्वाली, एकांकिका आणि पाश्चात्त्य समूह गायन अशा विविध कलाप्रकारांत विद्यार्थी आपले कौशल्य सादर करणार आहेत. तिसऱ्या दिवशी जलसा, शास्त्रीय नृत्य, भारतीय समूह गायन, वादविवाद, मृदूमूर्तिकला, नक्कल, कथाकथन, रांगोळी, लोकनृत्य व आदिवासी नृत्य, शास्त्रीय गायन, कलात्मक जुळवणी (इन्स्टॉलेशन) आणि एकांकिका या स्पर्धा होणार आहेत. सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत समारोप सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या समारोप व पारितोषिक वितरण समारंभाला सुप्रसिद्ध सिनेअभिनेते तथा पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महोत्सवातील विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या वेळी गौरविण्यात येणार आहे.
Source link
'ज्ञानतीर्थ-2026' युवक महोत्सवाचा नांदेडमध्ये कलाविष्कार:भारत गणेशपुरे यांच्या हस्ते उद्घाटन; विद्यार्थ्यांनी स्वतःचे भविष्य घडवावे- कुलगुरू डॉ. मनोहर चासकर