![]()
देशभरात सध्या नवरात्रोत्सवाचा आणि गरब्याचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी देवीची भक्तीभावाने पूजा आणि दांडियाचे आयोजन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर, भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या ‘रायगड प्रतिष्ठान’तर्फे बोरिवलीतील बाळासाहेब ठाकरे मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य गरबा महोत्सवात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी तरुणाईचा उत्साह आणि गरब्याचा रंगतदार माहोल पाहायला मिळाला. प्रवीण दरेकर यांनीही अमृता फडणवीस यांच्यासोबत ठेका धरला अमृता फडणवीस यांनी नुकतेच ऑक्टोबर २०२६ मध्ये नवरात्रीच्या निमित्ताने ‘मारी महिसागर’ हे नवीन गाणे रिलीज केले आहे. बोरिवलीतील या गरबा महोत्सवात हे गाणे वाजवण्यात आले, तेव्हा उपस्थित तरुणाईने यावर मोठ्या उत्साहात ठेका धरला. स्वतः आमदार प्रवीण दरेकर यांनीही अमृता फडणवीस यांच्यासोबत या गाण्यावर ताल धरून गरब्याचा आनंद लुटला. आपल्या गाण्याला मिळणारा लोकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून अमृता फडणवीस यांनीही विशेष आनंद व्यक्त केला. यावेळी प्रवीण दरेकर यांनी अमृता फडणवीस यांचे कौतुक करताना म्हटले की, “वहिनी आल्या आणि या कार्यक्रमाचा चेहरामोहराच बदलून गेला. वहिनींचे गाणे आजच्या गरब्यासाठी खऱ्या अर्थाने ‘हिट’ ठरले आहे.” ‘गरबा आणि नवरात्र म्हणजे नारीशक्तीचा उत्सव’ कार्यक्रमातील भक्तीमय वातावरणाबाबत बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, “बोरिवलीतील या अत्यंत सुंदर कार्यक्रमात उपस्थित राहताना मला अतिशय आनंद होत आहे. येथील गर्दी आणि देवीच्या भक्तीने भारावलेले वातावरण खूप उत्साहवर्धक आहे. सर्व जण अत्यंत आनंदाने गरबा खेळत आहेत. मुळात गरबा आणि नवरात्रीचा सण हा ‘नारीशक्ती’चा उत्सव आहे.” आपल्या संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करताना त्या पुढे म्हणाल्या, “रायगड प्रतिष्ठानने अत्यंत सुंदर आयोजन केले आहे. लोक एकत्र येऊन आपली परंपरा पुढे नेत आहेत, हे पाहून खूप समाधान वाटते. स्त्रीशक्तीवर केंद्रित असलेली आणि विविधरंगी, दोलायमान पोशाखांनी सजलेली ही परंपरा आपली संस्कृती एकसंध ठेवण्यास मदत करते. अशा प्रकारच्या उत्सवांमुळे समाजात एकतेची आणि एकोप्याची भावना निर्माण होते.” —————— हेही वाचा.. कोर्टाची देवी: संभाजीनगरातली 350 वर्षांपूर्वीची पहिली स्वयंभू रेणुका माता; तांबुलाचा प्रसाद, काचेची कलाकुसर अन् दाट हिरवाई
कालांतराने शहरं बदलतात, अनेक गोष्टी काळाच्या ओघात मागे पडतात. मात्र, काही ठिकाणांचा इतिहास आणि त्यांच्याशी जोडलेली श्रद्धा आजही तितकीच कायम आहे. केशरसिंगपुरा येथील रेणुका माता मंदिर हे त्याचंच एक उदाहरण. या मंदिराला एक- दोन नव्हे तर तब्बल 350 वर्षांचा इतिहास आहे. हे मंदिर शहरातील जिल्हा न्यायालयाच्या पाठीमागे वसलेले असल्यामुळे या ठिकाणाला कोर्टाची देवी म्हणूनही ओळखले जाते. सविस्तर वाचा
Source link
वहिनी आल्या अन् कार्यक्रमाची रंगत वाढली- दरेकर:अमृता फडणवीसांनी नव्या गाण्यावर धरला ठेका, गरबाप्रेमींसोबत प्रवीण दरेकरांनीही लुटला आनंद