![]()
राज्यात सध्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे वारे वाहत असून, सर्वच प्रमुख राजकीय पक्ष, महायुती आणि महाविकास आघाडी विजयासाठी कसून रणनीती आखत आहेत. मात्र याच दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अनपेक्षित आणि नाट्यमय घडामोड समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे आणि शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांना डावलून थेट महाविकास आघाडीचे (शरद पवार गट) उमेदवार प्रतापसिंह पाटील यांना पाठिंबा दिला आहे. सत्तार यांनी पाटील यांच्यासाठी जाहीर सभा घेऊन त्यांचा प्रचार केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, त्यांचा हा अनपेक्षित निर्णय महायुतीसह पर्यायाने एकनाथ शिंदे यांच्यासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, मंत्री संजय शिरसाट यांनी महायुतीमध्ये कुठलाही वाद नसल्याचे जाहीर केल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी शरद पवारांच्या उमेवाराच्या स्टेजवर जाऊन त्यांना पाठिंबा दर्शवला. यामुळे महायुतीमध्ये पुन्हा अंतर्गत वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शशिकांत शिंदे काय म्हणाले? यावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, एखाद्या नेत्याने वैयक्तिक पाठिंबा दिला असेल. आम्ही काही त्यांच्याशी चर्चा केली नव्हती. परंतु प्रतापसिंह पाटील विजयी व्हावे, असे त्यांना वाटत असावे. समोरच्या उमेदवाराविषयी नाराजीचा सूर पक्षांमध्ये आणि मतदारांमध्ये आहे. त्यामुळेच सत्तार यांनी वेगळा निर्णय घेतला असेल, असे शिंदे यांनी म्हटले आहे. भाजप मित्र पक्षांना संपवण्याचे काम करते तसेच शिंदे गटातील नेते नाराज आहेत का, असा प्रश्न शशिकांत शिंदे यांना विचारला असता ते म्हणाले, देशात राज्यात आणि केंद्रात तुम्ही भाजपचा इतिहास बघितला असेल तर जेवढे पक्ष त्यांच्या मदतीला आले, तेवढे पक्ष त्यांनी हळूहळू संपवले. आता सुद्धा या राज्यात त्यांचे दोन मित्र पक्ष आहेत. त्या पक्षांना 2029 पर्यंत हळूहळू संपवण्याचा प्रयत्न होईल. जिथे जिथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, सहकार क्षेत्रातील असतील, तिथे तिथे मित्र पक्षांचे असलेले अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न भाजप करत असतो. अशी मानसिकता त्यांच्या मित्र पक्षांमध्ये झाली असावी. त्यामुळे हा नाराजीचा सूर असावा, असे शिंदे यांनी म्हटले.
Source link
एकनाथ शिंदेंना मोठा धक्का!:अब्दुल सत्तारांचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा; शशिकांत शिंदेंचा भाजपवर निशाणा