![]()
जुन्या शहरातील रोशन गेट ते चंपा चौक या वर्दळीच्या मार्गावर शनिवारी (१७ ऑक्टोबर) सकाळी ११.३० वाजता मनपाने अतिक्रमण निर्मूलन कारवाई केली. काही नागरिकांचा विरोध झुगारून प्रशासनाने ४५० ते ४६० अतिक्रमणे जमीनदोस्त केली. मनपाच्या या कारवाईमुळे १५ मीटरचा रस्ता मोकळा झाला आहे. शनिवारी सकाळी अतिक्रमण विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांचा ताफा रोशन गेट परिसरात धडकला. कारवाईला काहींनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण अडथळा आणल्यास थेट गुन्हे दाखल करू, असा इशारा दिल्याने विरोध मावळला. ही कारवाई उपायुक्त सविता सोनवणे, सहायक आयुक्त रफिक शेख, रमेश मोरे, लता भांडवले, इमारत निरीक्षक रवींद्र देसाई आदींच्या उपस्थितीत पार पडली. प्रमोद जाधव यांच्यासह नागरी मित्र पथकाचे २० जवान, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांनी ही मोहीम फत्ते केली. व्यापाऱ्यांनाही फायदा होईल मोजक्या दुकानदारांच्या अतिक्रमणामुळे लाखो वाहनधारकांना त्रास होत होता. आता रस्ते मोकळे झाल्याने वाहतूक सुरळीत होईल आणि व्यापाऱ्यांनाही अधिक ग्राहक मिळतील. – सय्यद उसामा, नगरसेवक नेत्यांनी सहकार्य करावे शहरातील रस्ते मोकळे करण्याचे आदेश दिले आहेत. कुणीही अडथळा निर्माण केल्यास गुन्हे दाखल केले जातील.लोकप्रतिनिधींनीही या कारवाईला सहकार्य करावे. – समीर राजूरकर, महापौर सिडको-हडकोच्या नागरिकांचा प्रवास होणार सुपरफास्ट आझाद चौक ते मनपा मुख्यालय हा रस्ता सिडको-हडकोला जुन्या शहराशी जोडतो. जालना रोडवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा उत्तम पर्यायी मार्ग असला तरी येथील अरुंद रस्ते आणि कोंडीमुळे नागरिक तिकडे जाणे टाळत होते. आता हा रस्ता मोकळा झाल्याने तसेच भविष्यात चंपा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय व एसपी मेस हा मार्गही मोकळा झाल्यास नागरिकांचा मोठा वेळ आणि इंधन वाचेल. शिवाय, अतिक्रमणामुळे रखडलेले स्मार्ट सिटीचे उर्वरित कामही आता वेगाने मार्गी लागेल.
Source link
छत्रपती संभाजीनगरातील रोशन गेट ते चंपा चौक 460अतिक्रमणे जमीनदोस्त:रस्ता 5तासांत मोकळा, सोमवारपासून पुन्हा कारवाई; अडथळा आणल्यास गुन्हे दाखल करू- मनपा