![]()
संसारात सुख हवे असेल, तर आधी जोडीदाराला सुख देण्याची तयारी हवी. चुका मोजण्यापेक्षा गुण ओळखा, तक्रारींपेक्षा कौतुक करा आणि एकमेकांविरुद्ध लढण्याऐवजी समस्येविरुद्ध एकत्र उभे राहा, असा वैवाहिक जीवनाचा व्यावहारिक मंत्र उपाध्याय प्रवर पूज्य प्रवीणऋषीजी यांनी तीन आठवड्यांच्या ‘ब्लिसफुल कपल शिबिरा’तून दिला. शिबिरार्थी प्रीती सी. मुथियान यांनी नोंदवलेल्या मुद्द्यांतून सुखी संसाराची गुरुकिल्ली उलगडली आहे. जोडीदाराला बदलण्याचा आग्रह धरण्याऐवजी त्याच्या विकासाची जबाबदारी स्वीकारा. सुख-दुःखाची देवाणघेवाण करा. प्रत्येक कौटुंबिक समस्या तिसऱ्या व्यक्तीपर्यंत नेण्यापेक्षा संवादातून सोडवण्याचा प्रयत्न करा. वारंवार तेच भांडण होत असेल, तर पद्धत बदला; कारण मार्ग तोच असेल, तर मंजिलही तीच राहते. चूक झाल्यावर ‘सॉरी’, मदत मिळाल्यावर ‘धन्यवाद’ आणि मनात प्रेम असेल तेव्हा ‘आय लव्ह यू’ म्हणायला संकोच करू नका, असा संदेश देण्यात आला. परिपूर्णता एका दिवसात येत नाही, वारंवार करेक्शन आणि प्रॅक्टिस लागते. सदाचाराची चर्चा खूप होते, पण ते जीवनात आणण्यासाठी सिस्टीम बनत नाही. नात्याच्या बहरण्याचे तीन तत्व: सुरक्षा, संवर्धन, सेलिब्रिशन. मुलाने अभ्यास केला नाही हे आपण लगेच सांगतो, पण जे केले त्याचे कौतुक विसरतो. बाभळीचे झाड काढले तर त्या जागी चांगले झाड लावा, म्हणजे चुकीच्या सवयी बाहेर काढताना चांगल्या सवयी वाढवा. गाडीची सर्व्हिसिंग करतो तशी नात्याचीही सर्व्हिसिंग हवी. नात्यातील जुन्या जखमा दाबून ठेवण्याऐवजी त्या समजून घ्या. मतभेदांमध्ये एकमेकांना हरवण्याऐवजी समस्या सोडवण्यावर भर द्या. जोडीदाराच्या चांगल्या गुणांचे कौतुक करणारे ‘अभिनंदन पत्र’ लिहिण्याचा उपक्रमही शिबिरात राबवण्यात आला. हनुमानजींना त्यांच्या शक्तीची जाणीव करून देणाऱ्या जांबवंताप्रमाणे जोडीदारातील क्षमता ओळखून त्याला प्रोत्साहन द्या. आत्मविश्वास कमी झाला, अपयश आले किंवा मन खचले, तर दोषांची यादी घेऊन बसू नका; त्याच्या पाठीशी उभे राहा. ‘तुम्हाला काहीच जमत नाही’ म्हणण्याऐवजी ‘तुम्ही नक्की करू शकता, मी तुमच्यासोबत आहे’ असे सांगा. संसारात एकमेकांचे वकील होऊ नका, एकमेकांचे बळ बना! यशात टाळ्या आणि अपयशात खांदा देणारे नातेच खऱ्या अर्थाने ब्लिसफुल! अपयशातही साथ देत ‘चला, आपण मिळून करूया’ हा विश्वास द्या. तक्रारी कमी, कौतुक जास्त! हाच सुखी संसाराचा पाया असल्याचे सांगत प्रीती मुथियान यांनी जोडप्यांना नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पुढील ‘ब्लिसफुल कपल शिबिरात’ सहभागी होण्याचे आवाहन केले. जोडीदाराने कधी काय चुकवले, कुठे दुखावले, हे आपण अगदी तारीख-वेळेसह लक्षात ठेवतो; पण त्याने केलेल्या प्रेमाच्या गोष्टींचा मात्र विसर पडतो! ही सवय बदलायची असेल, तर जोडीदाराचे चांगले गुण, त्याने दिलेली साथ आणि आनंदाचे क्षण कागदावर उतरवा. त्याचे सुंदर ‘अभिनंदन पत्र’ तयार करा आणि फ्रेम करून डायनिंग हॉलमध्ये लावा. जेवताना रोज नजरेस पडेल आणि तक्रारींच्या ताटात कौतुकाची फोडणी पडेल! जुन्या चुका उगाळण्यापेक्षा प्रेमाच्या आठवणी उजळा; संसाराचा स्वाद आपोआप बदलेल!
Source link
संसार टिकवायचा नाही, फुलवायचा:पूज्य प्रवीणऋषीजी यांचे तीन आठवड्यांच्या शिबिरातून दाम्पत्यांना नातेसंबंधांचे धडे