![]()
राहुरी नगर-मनमाड महामार्गावरील अपघातांचे सत्र आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त झाले असतानाच, शनिवार-रविवारच्या सलग सुट्टीत ठेकेदाराच्या नियोजनशून्य कारभाराचा पुन्हा फटका बसला. शुक्रवारी रात्री ११ वाजता सुरू झालेली वाहतूक कोंडी शनिवारी दुपारी साडेअकरा तासांनंतर सुटली. नगर-मनमाड महामार्गावर विद्यापीठातील सिमेन्स सेंटर आणि राहुरी फॅक्टरी येथे एकाच वेळी रस्त्याची कामे सुरू करण्यात आली. मात्र, वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली नव्हती. कामामुळे काही ठिकाणी महामार्ग एकेरी झाला. त्यात रस्त्यावर मातीचे मोठे ढिगारे टाकल्याने एका बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद झाली. अवजड वाहनांना मार्ग काढताना अडचणी आल्या. यातच दोन ते तीन कंटेनर बंद पडल्याने कोंडीत भर पडली. कंटेनर हलवण्यासाठी क्रेनलाही घटनास्थळी पोहोचता येत नव्हते. त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू राहिली. महामार्गावर १० ते १२ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख आणि त्यांच्या पथकाने प्रयत्न केले. मात्र, रस्त्यावरील कामांचे नियोजन, बंद पडलेली अवजड वाहने आणि पर्यायी व्यवस्थेचा अभाव यामुळे पोलिसांनाही अडचणींचा सामना करावा लागला. अखेर सुमारे १२ तासांच्या प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळीत झाली. ठेकेदाराच्या नियोजनातील त्रुटीची किंमत हजारो प्रवाशांना मोजावी लागली. महिनाभरात दुसऱ्यांदा वाहतूक कोंडी अहिल्यानगर–मनमाड महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत हा महामार्ग दुसऱ्यांदा पूर्णपणे ठप्प झाल्याने प्रवासी, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यापूर्वी २ ऑक्टोबरला हा महामार्ग १४ तास ठप्प झाला होता. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येवर तोडगा काढण्यात महामार्ग व वाहतूक पोलीस अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. नगर मनमाड महामार्गावर शुक्रवारी रात्री ११ झालेली वाहतूक कोंडी शनिवारी ११.३० वाजेनंतर सुटली. वाहतुकीचे नियोजन कोण करणार, हा प्रश्न ऐरणीवर नगर-मनमाड महामार्गावरील वाहतूक कोंडीमागे एकाच वेळी सुरू असलेली दोन कामे, रस्त्यावरील मातीचे ढिगारे, बंद पडलेले कंटेनर आणि वाहतुकीच्या नियोजनाचा अभाव ही प्रमुख कारणे ठरली. परिणामी, १० ते १२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आणि हजारो वाहनचालकांना तासन्तास अडकून पडावे लागले. महामार्गाचे काम सुरू असताना वाहतुकीचे नियोजन कोण करणार, हा प्रश्न या घटनेने ऐरणीवर आणला आहे.
Source link
नियोजनशून्य कारभाराचा फटका:एकाच वेळी 2 ठिकाणी कामे; कंटेनर अडकले, महामार्ग 12 तास ठप्प