Headlines

आमदार सुनील शेळके यांच्यावर मारहाणीचा आरोप:माहिती अधिकार कार्यकर्त्याला जिल्हाधिकारी कार्यालयात मारहाण, पोलीस संरक्षणाची मागणी




पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील गुजर यांनी केला आहे. या प्रकरणाचा तातडीने तपास करून संबंधितांवर कारवाई करावी, पोलिस संरक्षण द्यावे, तसेच मावळमधील टाटा प्रकल्प आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) क्षेत्रातील गौण खनिज उत्खननाची चौकशी करण्यासाठी समिती नेमावी, अशी मागणी गुजर आणि करुणा सरोदे यांनी पत्रकार परिषदेत केली. गुजर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळमधील खाणींच्या रॉयल्टीसंदर्भातील कथित गैरव्यवहारांची माहिती त्यांनी माहिती अधिकारातून मिळवली होती. याच पार्श्वभूमीवर १६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील एका खोलीत बंद करून आमदार शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याचा त्यांचा आरोप आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांनी प्रकरणाची दखल घेऊन तपास जलदगतीने करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. मारहाणीच्या वेळी गुजर यांच्याकडील बॅग हिसकावून त्यातील महत्त्वाची कागदपत्रे गहाळ करण्यात आल्याचा, तसेच महिला कार्यकर्त्या करुणा सरोदे यांना धक्काबुक्की केल्याचाही आरोप करण्यात आला. या प्रकरणात महिलेला शिवीगाळ व धक्काबुक्की होऊनही स्वतंत्र गुन्हा का दाखल झाला नाही, असा सवाल सरोदे यांनी उपस्थित केला. पोलिसांनी राजकीय दबावाखाली कारवाई केल्याचा आरोपही त्यांनी केला. मावळमधील आंबळे येथील खाणी, एमआयडीसीला देण्यात आलेली जमीन आणि टाटा प्रकल्पातील गौण खनिज उत्खनन यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा दावा गुजर यांनी केला. आमदार शेळके आणि त्यांच्या कुटुंबीयांचा या प्रकरणांत सहभाग असल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित व्यवहारांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली. एमआयडीसीला दिलेल्या खड्डेमय जागेत अद्याप उत्खनन सुरू असल्याचाही दावा त्यांनी केला. “माहिती अधिकारातून भ्रष्टाचाराची माहिती मिळवून कारवाईसाठी पाठपुरावा करणे हे आमचे काम आहे. मारहाण करून दबाव आणण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. भ्रष्टाचाराविरोधातील लढा सुरूच राहील,” असे गुजर यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *