Headlines

शेतकऱ्यांना 5 हजार रुपये देऊन काय होणार?:सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली; सुप्रिया सुळेंचा आरोप




राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांची कर्जमाफी, बँकांकडून कर्जाची रक्कम रोखून ठेवण्याचे प्रकार आणि वाढती गुन्हेगारी या मुद्द्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “5 हजार रुपयांत काय होणार? शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत मिळाली पाहिजे. काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्यांची या सरकारने फसवणूक केली आहे,” असा आरोप त्यांनी केला. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ‘शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची मदत द्या’ राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या मदतीवर बोलताना सुळे म्हणाल्या की, सरकारकडून शेतकऱ्यांना 5 हजार रुपयांची मदत दिली जात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शेतकऱ्यांचे नुकसान पाहता ही रक्कम पुरेशी नाही. शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपयांची मदत मिळाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचेही पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत, असा दावा त्यांनी केला. योजनेचे 2 हप्ते म्हणजेच 4 हजार रुपये अद्याप मिळाले नसल्याचे सांगत, दुष्काळी मदतीचे 5 हजार आणि योजनेचे 4 हजार रुपये मिळून शेतकऱ्यांना 9 हजार रुपये मिळायला हवेत. त्याशिवाय हेक्टरी 1 लाख रुपयांच्या मदतीची मागणी कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘बँकांना पैसे रोखून ठेवण्याचा अधिकार नाही’ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील ढोरंगव्हाण गावात कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर नवीन कर्जाची रक्कम जमा झाली; मात्र बँक अधिकारी ती रक्कम रोखून ठेवत असल्याची तक्रार पत्रकारांनी केली. यावर प्रतिक्रिया देताना सुळे म्हणाल्या, “सरकारने खरंच निधी दिला असेल, तर बँकेला तो अडवण्याचा अधिकार नाही. हा प्रकार असेल, तर तो चिंताजनक आहे.” या प्रकरणाची माहिती आपण स्वतः मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘दुष्काळाच्या काळात निवडणुका नकोत’ राज्यातील दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली होती, असे सुळे म्हणाल्या. “हा निवडणुकांचा काळ नाही, तर शेतकऱ्यांना न्याय देण्याचा काळ आहे. शेतकरी आपल्यासाठी प्रचंड मेहनत करतो. आज आपण त्याला साथ देणार नाही, तर कधी देणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दुष्काळाच्या मुद्द्यावर राजकारण करण्याची इच्छा नसून, अडचणीत असलेल्या महाराष्ट्रातील जनतेला मदत करणे हीच प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांनीही मुख्यमंत्र्यांना 2 पत्रे लिहून विविध सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. ‘वसुली थांबवण्याचे आश्वासन, तरीही महिलांना त्रास’ मराठवाड्यात मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून महिलांची वसुली होत असल्याच्या तक्रारींवरही सुळे यांनी चिंता व्यक्त केली. सरकारकडून अडचणीच्या काळात वसुली केली जाणार नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात महिलांकडून वसुली सुरूच असल्याचा आरोप त्यांनी केला. “रात्री 10 वाजेपर्यंत घरी येऊन पैसे मागितले जात असतील, तर सरकारने कारवाई केली पाहिजे,” असे त्या म्हणाल्या. मायक्रोफायनान्सच्या माध्यमातून महिलांवर होणाऱ्या कथित अन्यायाबाबत रोहित पवार यांनीही पत्रकार परिषद घेऊन मुद्दा मांडल्याचे त्यांनी नमूद केले. ‘राज्यात गुन्हेगारी वाढतेय, सामान्यांनी जगायचे कसे?’ अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबार आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर सुळे यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. “सत्ताधारी पक्षातील आमदाराच्या कुटुंबालाही सुरक्षेची मागणी करावी लागत असेल, तर सामान्य माणसांनी या राज्यात जगायचे कसे?” असा सवाल त्यांनी केला. राज्यातील गुन्हेगारी वाढत असल्याचे सांगताना त्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अहवालाचाही संदर्भ दिला. खत कंपन्यांच्या प्रकरणावर सरकारने उत्तर द्यावे खत कंपन्यांवरील कारवाई स्थगित करण्याच्या निर्णयाविरोधात 22 कंपन्यांनी अपील केल्याच्या आणि त्यासाठी आमदारांच्या शिफारशी जोडल्याच्या मुद्द्यावर सुळे यांनी भाष्य केले. हा सरकारच्या अंतर्गत विभागाचा विषय असल्याने त्याचे उत्तर संबंधित विभागाने आणि सरकारने दिले पाहिजे, असे त्या म्हणाल्या. “आम्ही विरोधी पक्षात आहोत. सरकारच्या निर्णयांबाबत सरकारनेच उत्तर दिले पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले. विधान परिषद निवडणुकीत पूर्ण ताकदीने लढणार आगामी विधान परिषद निवडणुका आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत बोलताना सुळे यांनी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या मित्रपक्षांशी नियमित चर्चा होत असल्याचे सांगितले. मैत्रीपूर्ण लढतीबाबत विचारले असता, अनेक विषयांवर मित्रपक्षांशी संवाद सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “जो कोणी परीक्षेला बसतो, तो पास होण्यासाठीच बसतो. आम्ही पूर्ण ताकदीने काम करणार आहोत,” असे त्या म्हणाल्या. निवडणुकीसंदर्भात काही सकारात्मक निर्णय झाल्यास त्याची माहिती दिली जाईल, असेही त्यांनी सूचित केले. दरम्यान, शिवसेनेतील अंतर्गत समन्वयाबाबत विचारलेल्या प्रश्नावर दुसऱ्यांच्या घरात डोकावण्याचा आपल्याला छंद नसल्याचे सांगत त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. शिक्षक संघटनेचा पाठिंबा जाहीर पत्रकार परिषदेदरम्यान महाराष्ट्र अंडरप्रिव्हिलेज्ड टीचर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींनी सुप्रिया सुळे यांना पाठिंब्याचे पत्र दिले. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत संघटनेने जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे सुळे यांनी पत्र वाचून सांगितले. एकूणच, छत्रपती संभाजीनगरमधील या पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती, दुष्काळी मदतीतील कथित त्रुटी, महिलांची वसुली, कायदा-सुव्यवस्था आणि आगामी विधान परिषद निवडणुका या मुद्द्यांवरून राज्य सरकारला धारेवर धरले. हेही वाचा… प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा:ठाणे महापालिका निवडणुकीतील जुन्या वैमनस्यातून हत्या केल्याचा आरोपींचा जबाब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे ठाण्यातील शाखाप्रमुख आणि विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या जुन्या वैमनस्यातून पूर्णेकर यांची हत्या केल्याचा जबाब आरोपींनी उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सच्या (एसटीएफ) चौकशीदरम्यान दिल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे. या दाव्याच्या समर्थनार्थ वकील समीर हाटले यांनी उत्तर प्रदेश एसटीएफचे 10 ऑक्टोबर 2026 रोजीचे प्रसिद्धिपत्रक न्यायालयात सादर केले. त्यामुळे या प्रकरणातील हत्येमागील संभाव्य कारणाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *