Headlines

अहंकार बाळगला की 'गोकुळ'सारखा निकाल लागतो:उदय सामंतांचा भाजप नेते जयकुमार गोरेंना टोला, 27 तारखेला सचिन सानप कोण हे कळेल!




“लोकशाहीमध्ये सर्वसामान्य उमेदवारालाही कमी लेखणे किंवा हिणवणे योग्य नसते. ज्या उमेदवाराला ४ मतेही मिळणार नसतील, तरी तो लोकशाहीतील उमेदवार असून त्याचा सन्मान राखला पाहिजे. ‘आमच्याकडे सत्ता आहे, मी बोलेन तेच अंतिम आणि खरं’, अशी अहंकाराची भावना जेव्हा डोक्यात शिरते, तेव्हा ‘गोकुळ’ दूध संघासारखा दणका बसतो. सत्ताधाऱ्यांनी हा अतिरेक वेळीच थांबवला नाही, तर मतदार असाच धडा शिकवतात,” असा अत्यंत जळजळीत टोला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भाजप नेते तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांना लगावला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सचिन सानप यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने सोलापूर दौऱ्यावर आले असताना उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मित्रपक्ष भाजपचे नेते जयकुमार गोरे यांनी सचिन सानप यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आणि महायुतीतील नेत्यांना सबुरीचा सल्ला दिला. कोण सानप विचारणाऱ्यांना 27 तारखेला निकालानंतर सानप कोण ते कळेल! काही दिवसांपूर्वी भाजप नेते जयकुमार गोरे यांनी जाहीर सभेत बोलताना “कोण सचिन सानप? मी त्यांना ओळखत नाही,” अशी उपरोधिक टिप्पणी केली होती. यावर सडेतोड प्रत्युत्तर देताना उदय सामंत म्हणाले, “आपण महायुती म्हणून सत्तेत एकत्र काम करतो, याचे भान जयकुमार गोरे यांनी ठेवले पाहिजे. कोणालाही हिणवणे किंवा तुच्छ लेखणे ही सुसंस्कृत राजकारणाची रीत नाही.” 27 तारखेला उत्तर मिळेल “जयकुमार गोरे यांना आज सचिन सानप कोण आहेत हे माहीत नसेल; पण येत्या २७ तारखेला जेव्हा मतमोजणी होईल आणि सानप आमदार म्हणून विजयी होतील, तेव्हा सचिन सानप कोण आहेत, हे जयकुमार गोरे यांना आपोआपच समजेल,” असा ठाम विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. पुण्यातील लढत भारत-पाकिस्तान युद्ध नाही; कोणालाही कमी लेखू नका! पुणे शिक्षक मतदारसंघातील महायुतीच्या अंतर्गत चुरशीवर बोलताना उद्योगमंत्र्यांनी सावधगिरीचा इशारा दिला. “पुणे शिक्षक मतदारसंघातील निवडणूक म्हणजे काही भारत आणि पाकिस्तानचे युद्ध नाही. ही एक मैत्रीपूर्ण लढत आहे. त्यामुळे विनाकारण टोकाचे आरोप-प्रत्यारोप करून कटुता निर्माण करू नये.” सबुरीने घ्या, मन दुखावू नका “राजकारणात कधीही काहीही घडू शकते. कोणाचेही मन दुखावले जाणार नाही आणि युतीमध्ये दरी पडणार नाही, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. आपण सर्वांनी एकत्र राहून सबुरीने घेतले, तरच महायुतीचा प्रत्येक ठिकाणी विजय सुकर होईल,” असे ते म्हणाले. ‘गोकुळ’ दूध संघाच्या निकालाचा दाखला; महायुतीला सत्तेच्या मग्रुरीचा फटका! जयकुमार गोरे यांना आरसा दाखवताना उदय सामंत यांनी कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या ताज्या निकालाचा थेट दाखला दिला. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी 25 पैकी 25 जागा जिंकण्याचा मोठा दावा केला होता. काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या पॅनेलला जेमतेम 4 जागा मिळतील, अशी चर्चा सत्ताधारी वर्तुळात रंगवली जात होती. प्रत्यक्षात सोमवारी जाहीर झालेल्या निकालात सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसप्रणित राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने 25 पैकी 13 जागा जिंकत महायुतीचा 13-12 अशा निसटत्या पण ऐतिहासिक फरकाने पराभव केला. याच निकालाचा संदर्भ देत सामंत म्हणाले की, “सत्तेचा माज आणि विरोधकांना तुच्छ लेखण्याची प्रवृत्ती जनतेला आवडत नाही. मतदारांनी शांतपणे मतपेटीतून दिलेला हा इशारा समजून घेतला पाहिजे.” पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीकडून अधिकृत उमेदवारीवरून सुरू असलेला अंतर्गत वाद आणि त्यातच शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी भाजपच्या नेत्याला ‘गोकुळ’च्या निकालाची आठवण करून दिल्याने महायुतीमधील अंतर्गत कुरघोडी आता चव्हाट्यावर आली आहे. ——————————————– हेही वाचा… नरेंद्र मेहतांची आमदारकी रद्द करा, प्रताप सरनाईकांची राज्यपालांकडे मागणी: म्हणाले- पत्रकारांवर हल्ला, मध्यरात्री महापालिका आयुक्तांच्या घरात घुसून ओलीस ठेवले! “मीरा-भाईंदर शहरात लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांवर आणि सामान्य नागरिकांवर महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांकडून भरदिवसा जीवघेणे हल्ले केले जातात. एवढ्यावरच न थांबता, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 250 ते 300 जणांचा जमाव मध्यरात्री एका तरुण आयएएस (IAS) महापालिका आयुक्तांच्या घरात बेकायदेशीरपणे घुसतो, त्यांच्या पत्नी व लहान मुलांसमोर त्यांना तब्बल 3 ते 4 तास ओलीस (बंधक) ठेवतो आणि पोलिसांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणतो. हा संपूर्ण प्रकार म्हणजे लोकशाहीची उघड हत्या आणि सत्तेचा नंगानाच आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या आमदार नरेंद्र मेहता यांची आमदारकी तत्काळ रद्द करण्यात यावी आणि घुसखोरी करणाऱ्या नगरसेवकांचे पद बरखास्त करावे,” अशी आक्रमक आणि खळबळजनक मागणी शिवसेना नेते तथा आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *