Headlines

Ramdas Kadam Attacks Manoj Jarange Over Allegations Against Eknath Shinde


“उपोषणाला बसायचे आणि बाथरूममध्ये जाऊन गुपचूप खायचे, अशा पद्धतीने जनतेची दिशाभूल करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या संपत्तीची सरकारने सखोल चौकशी लावली पाहिजे. मराठा समाजाचे नेते झाल्यापासून जरांगे यांच्या नावावर, त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर किती जमिनी झ

.

गोरेगाव येथील नेस्को (NESCO) सेंटरमध्ये आयोजित शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम बोलत होते. यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ यांच्यासह मंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित होते. सुमारे 15 मिनिटांच्या आपल्या भाषणात कदम यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत आणि काँग्रेसवर तुफानी हल्ला चढवला.

500 कोटींचा पुरावा दाखव, नाहीतर जाहीर माफी माग!

दसरा मेळाव्यात मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या 500 कोटींच्या कथित आरोपाचा समाचार घेताना रामदास कदम म्हणाले, “एकनाथ शिंदे हे दोन्ही हातांनी समाजाला भरभरून देणारे नेते आहेत, कोणाकडून लाचारी पत्करणारे नाहीत. जरांगे म्हणतात शिंदेंनी 500 कोटी रुपये घेतले आणि मला आणून दिले. मग दाखवा ते 500 कोटी कुठे आहेत? कुठल्या गाडीतून आले, कोणी मोजले आणि कुठे गेले? बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल! कोणाची सुपारी घेऊन एका स्वाभिमानी मराठा नेत्याला संपवायचा डाव रचता आहात?”

संपत्तीची चौकशी लावा

“शिंदे साहेब, माझी आपल्याला जाहीर विनंती आहे की या जरांग्यांची तत्काळ उच्चस्तरीय चौकशी लावा. यांच्याकडे इतक्या महागड्या गाड्या कुठून आल्या, उपोषणाचा दिखावा करून यांनी किती माया जमवली, हे महाराष्ट्रातील जनतेसमोर उघड झालेच पाहिजे. ज्या गावात उपोषण सुरू होते, त्या गावच्या लोकांनीच यांना हाकलून लावले आहे.”

उद्धव ठाकरेंची अवस्था ‘शोले’तील असरानीसारखी

शिवाजी पार्कवर चाललेल्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यावर आणि उद्धव ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वावर टीका करताना ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंची अवस्था ‘शोले’ चित्रपटातील त्या जेलरसारखी झाली आहे; जो म्हणतो ‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ और बाकी मेरे पीछे आओ’ आणि मागे वळून बघतो तर कोणीच नसते. आज उद्धवजींच्या मागे कोणी शिल्लक राहिलेले नाही. शिवसेनाप्रमुखांनी जे शिवाजी पार्कचे मैदान सलग 40 वर्षे एकहाती गाजवले, त्या मैदानाची अवस्था आज काय झाली आहे? पाल मेल्यानंतर जशी तिची शेपटी वळवळते, तशी उद्धव ठाकरेंची वळवळ सुरू आहे. मी राजकारणात अजून जिवंत आहे, हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.”

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा

“संजय राऊत म्हणतात खरी शिवसेना आमची आहे. अरे संजय राऊत, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे जिवंत असते, तर त्यांनी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ दिले असते का? रामदास कदम आणि दिवाकर रावते यांच्यासारखे निष्ठावंत नेते कधी मंत्रिमंडळाबाहेर गेले असते का?”

महाराष्ट्राने 232 आमदार शिंदेंच्या नेतृत्वाखाली निवडून दिले; तेच आमचे भावी मुख्यमंत्री!

सत्तेतील संख्याबळावर स्पष्टीकरण देताना रामदास कदम यांनी आत्मविश्वास व्यक्त केला. “काही जण म्हणतात आमचे संख्याबळ कमी आहे. विधानसभेच्या निवडणुका या आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या आणि महाराष्ट्रातील जनतेने महायुतीचे तब्बल 232 आमदार निवडून दिले. एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे लाडके नेते असून तेच आमचे भावी मुख्यमंत्री आहेत.”

33 वर्षे सेवा केलेले न्यायाधीश शिवसेनेत

“ज्यांनी उच्च न्यायालयात तब्बल 33 वर्षे न्यायाधीश म्हणून काम केले, ते आज निवृत्तीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहेत. उद्धव ठाकरे, डोळे उघडून बघा, ही तुमच्या कारभारावर जनतेने ओढलेली चपराक आहे.”

दुष्काळात 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण!

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना त्यांनी शिवसैनिकांना थेट बांधावर जाण्याचे आवाहन केले. “महाराष्ट्रावर दुष्काळाचे भीषण सावट असताना उत्सव साजरा न करता, शिवसैनिकांना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बांधावर पाठवण्याचा संवेदनशील निर्णय फक्त एकनाथ शिंदे घेऊ शकतात. शिवसेनाप्रमुखांनी दिलेला ’80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण’ हाच विचार घेऊन उद्यापासून प्रत्येक शिवसैनिकाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे आहे.”

विरोधकांचा अजेंडा संपला

“दुष्काळात मदत करण्याऐवजी विरोधक शाळेतील मुलांना हाताशी धरून आंदोलने करत आहेत. दिल्लीतल्या ‘पप्पू’ला हे कळत नाही की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोट्यवधी गरिबांना मोफत धान्य देऊन आशीर्वाद मिळवले आहेत, जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवले आणि अयोध्येत भव्य राम मंदिर उभारले. अशा नेतृत्वाविरुद्ध सत्ता बदलाच्या बाता मारणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही.” आपल्या भाषणाचा समारोप करताना रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांना पूर्ण पाठिंबा दर्शवत, मराठा समाजाचे नेतृत्व संपवण्याचा कोणाचाही डाव शिवसैनिक आणि महाराष्ट्र कधीही खपवून घेणार नाही, असा सज्जड इशारा दिला.

——————————————————-

हेही वाचा…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संबोधनाला सुरुवात: शेतकरी मदत ते 500 कोटींच्या आरोपापर्यंत, काय बोलणार याकडे लक्ष

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा आज गोरेगाव येथील नेस्को मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात शिंदे कोणती राजकीय भूमिका मांडतात, तसेच विरोधकांच्या आरोपांना कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदाचा हा मेळावा केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांपुरता मर्यादित न ठेवता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीशी जोडण्याचा प्रयत्न पक्षाने केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.