![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘एक्सपायरी डेट’ आता संपली असून, आगामी एप्रिल महिन्यापासून त्यांची घसरगुंडी सुरू होईल आणि मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत त्यांचे सरकार कोसळेल, असा अत्यंत मोठा आणि खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘देशातील प्रमुख नेत्यांचीही हीच भूमिका’ देशात सध्या वेगाने राजकीय वातावरण बदलत असल्याचा दावा करत संजय राऊत म्हणाले, “माझ्या या दाव्याप्रमाणेच देशातील प्रमुख नेत्यांच्या विचारांची दिशा आता मला दिसत आहे. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हीच भूमिका मांडली होती आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही हेच सांगत आहेत. दिल्लीमध्ये राहुल गांधी हेच बोलत आहेत आणि मी स्वतः हे वारंवार सांगतोय.” ‘अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मोदींची भेट टाळली’ देशातील बदलत्या राजकीय परिस्थितीचे उदाहरण देताना संजय राऊत यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या दौऱ्याचा दाखला दिला. ते म्हणाले, “अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री भारतात आले, पण ते थेट मुंबईत आले. त्यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनाही दिल्लीतून मुंबईत बोलावून घेतले. यापूर्वी एखादा डेप्युटी मिनिस्टर आला तरी तो दिल्लीत जाऊन मोदी आणि इतर नेत्यांना भेटत असे. मात्र, यावेळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री दिल्लीला न जाता मुंबईत आले आणि त्यांनी मोदींची भेट घेतली नाही.” ‘अहमदाबादला जाण्याची प्रथा मोडली’ भाजप आणि मोदी सरकारवर निशाणा साधताना राऊत यांनी अहमदाबादच्या मुद्द्यावरूनही टोला लगावला. “आतापर्यंत देशात येणाऱ्या सर्व प्रमुख विदेशी पाहुण्यांना अहमदाबादला नेण्याची एक प्रथाच पडली होती. मात्र, अमेरिकेच्या या मंत्र्याने ही प्रथा मोडली आणि ते मुंबईत आले,” असे संजय राऊत यांनी सांगितले. संजय राऊत यांच्या या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, यावर सत्ताधारी भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राज ठाकरे काय म्हणाले होते? देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुढील 4 ते 5 महिन्यांत देशात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. देशात काहीतरी मोठी गडबड होईल, असा अंदाज व्यक्त करतानाच एका टप्प्यावर देशाला पंतप्रधानच नसण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असेही ते म्हणाले. सरकारकडून चुका सुरूच राहिल्या, तर देशभरातील लोक रस्त्यावर उतरले तरी आश्चर्य वाटणार नाही, असे भाकीत त्यांनी केले. ————————— हेही वाचा.. राज ठाकरेंचे वक्तव्य म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’: पंतप्रधान देशाला नसतील या भाकितावर प्रवीण दरेकरांचा पलटवार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी 3 ते 4 महिन्यांमध्ये देशात मोठा बदल होईल आणि एक काळ असा येईल की देशाला पंतप्रधानच नसेल, असे खळबळजनक भाकीत वर्तवले होते. राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असतानाच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी त्यावर जोरदार पलटवार केला आहे. सविस्तर वाचा
Source link
संजय राऊतांचा पुन्हा मोठा दावा:म्हणाले- पंतप्रधान मोदींची एक्सपायरी डेट संपली, एप्रिलपासून घसरगुंडीची सुरुवात, मे शेवटचा आठवडा असेल