![]()
नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी चंद्रपूर जिल्ह्यासह संपूर्ण विभागात मतदानाची रणधुमाळी सुरू असतानाच, मतदान प्रक्रियेतील ढिसाळ नियोजनावरून भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “रिंगणात तब्बल 38 उमेदवार असल्याने मतपत्रिकेचा आकार चौरंगाएवढा मोठा झाला आहे. मात्र, मतपेटीचे छिद्र अत्यंत लहान असल्याने मतपत्रिकेची जाड घडी आत सरकवताना ती फाटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मतपत्रिका डब्यात कोंबताना फाटली तर निवडणूक अधिकाऱ्यांनी ती कोणत्याही परिस्थितीत अवैध (Invalid) ठरवू नये,” अशी थेट आणि आक्रमक मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. चंद्रपूर शहरातील एफईएस (FES) कॉलेजमधील मतदान केंद्रावर जाऊन सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना निवडणूक आयोगाच्या नियोजनशून्यतेवर सडकून टीका केली. मागच्या वेळी 11,000 मते अवैध ठरवली; हा आचारसंहितेचा आतंकवाद थांबवा! निवडणूक प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटींवर बोट ठेवत सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “मतपत्रिकेवर 38 उमेदवारांची नावे असल्याने तिचा आकार पाटा किंवा चौरंगाएवढा प्रचंड मोठा आहे. मतदाराला पसंतीक्रम नोंदवायला काही सेकंद लागतात; मात्र मतपत्रिकेची घडी करून ती बॅलेट बॉक्समध्ये टाकायला काही मिनिटे खर्ची घालावी लागत आहेत. इतकी जाड घडी त्या लहान छिद्रातून जबरदस्तीने आत दाबावी लागत असल्याने मतपत्रिका फाटण्याचा धोका आहे.” फाटलेली मते अवैध ठरवू नका “निवडणूक नियमांनुसार मतपत्रिका फाटलेली आढळल्यास मतदाराने काहीतरी खूण किंवा सिग्नल दिला असे गृहीत धरून ती मतपत्रिका थेट अवैध ठरवली जाते. मागच्या निवडणुकीत अशाच चुकीच्या नियोजनामुळे तब्बल 11,000 मते अवैध ठरवण्यात आली आणि राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवर नाहक प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले. 38 उमेदवार असताना मतपत्रिकेची घडी पेटीत जाईल की नाही, याचा साधा विचारही अधिकाऱ्यांनी केला नाही का? दुष्काळ निवारणाच्या बैठकांना आचारसंहितेचे कारण सांगून अडवणारे अधिकारी निवडणुकीचे नियोजन मात्र असे ढिसाळ करतात. हा आचारसंहितेचा निव्वळ आतंकवाद सुरू आहे. मी स्वतः आयुक्तांना पत्र लिहून मागणी केली आहे की, छिद्रात अडकून फाटलेली कोणतीही मतपत्रिका अवैध ठरवली जाऊ नये.” मतदान हे पवित्र कर्तव्य “मी स्वतः रोज मंदिरात जातो. मात्र, एका दिवशी मंदिरात गेलो नाही तरी चालेल, पण मतदानाचा हक्क कधीही चुकवला नाही. हजारो क्रांतिकारकांनी बलिदान देऊन मिळवलेल्या या लोकशाही अधिकाराचा सन्मान राखत जनतेने मोठ्या संख्येने मतदान करून भाजपच्या विकासकामांना साथ द्यावी.” चंद्रपूर जिल्ह्यात सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत 8.52% मतदान! नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील 58 मतदान केंद्रांवर सकाळी 8 वाजल्यापासून मतदान सुरू झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 32,262 पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत. सकाळी 8 ते संध्याकाळी 4 या वेळेत हे मतदान पार पडत आहे. मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रशासनातर्फे 4 तासांची विशेष सवलत देण्यात आली आहे. सकाळी मतदानाच्या पहिल्या 2 तासांत म्हणजेच सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत जिल्ह्यात 8.52% मतदानाची नोंद झाली आहे. माझ्या प्रतिनिधीला केंद्रावर अडवले; नितेश कराळेंचा गंभीर आरोप दुसरीकडे, नागपूर पदवीधर मतदारसंघातील अपक्ष बंडखोर उमेदवार नितेश कराळे यांनी मतदान प्रक्रियेत घोळ होण्याची दाट शंका उपस्थित केली आहे. “माझा जनतेमधील वाढता प्रभाव पाहून सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी येथील मतदान केंद्रावर केवळ स्वाक्षरीच्या किरकोळ कारणावरून माझ्या अधिकृत प्रतिनिधीला आत जाण्यापासून अडवण्यात आले. हा आम्हाला रोखण्याचा जाणीवपूर्वक केलेला कट आहे. निवडणूक यंत्रणा निष्पक्ष काम करण्याऐवजी पूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली काम करत आहे,” असा घणाघाती आरोप नितेश कराळे यांनी केला आहे. ————————————————————- हेही वाचा… अडीच वर्षांनंतर ऑडिओ क्लिप बाहेर येण्यामागे हेतू काय?: फॉरेन्सिक चौकशीतून सत्य बाहेर काढणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा, स्पाय पेनवरून सुप्रिया सुळेंना टोला राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी आज मतदान पार पडत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर सविस्तर भाष्य केले. मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक चौकशी केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच, पुण्यात भाजपकडून ‘स्पाय पेन’चा वापर होत असल्याच्या आरोपांवरून त्यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
चौरंगाएवढी मतपत्रिका अन् बॅलेट बॉक्सचे छिद्र मात्र लहान!:पेटीत टाकता-टाकता मतपत्रिका फाटली तर अवैध ठरवू नका -सुधीर मुनगंटीवार