![]()
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर, अचूक नियोजन आणि शास्त्रीय पोषण व्यवस्थापन लाभल्यास प्रतिकूल परिस्थितीतही सोन्यासारखे उत्पादन घेता येते, हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील प्रगतशील शेतकरी हिंदुराव नामदेवराव पिसाळ यांनी सिद्ध केले आहे. त्यांनी अवघ्या ३५ गुंठे क्षेत्रात केळीचे तब्बल ३७ ते ४० टनांचे विक्रमी उत्पादन मिळवले. यात बागेतील एका-एका घडाचे वजन ५५ किलोपर्यंत भरल्याने परिसरात या यशस्वी प्रयोगाचे कौतुक होत आहे. पिसाळ यांनी ३५ गुंठ्यांच्या क्षेत्रात ७ बाय ५ फूट अंतरावर ११८० रोपे लावली होती. संपूर्ण बागेसाठी त्यांनी “डबल ड्रीप’ (दुहेरी ठिबक) सिंचन पद्धतीचा वापर करून पाण्याचे सुक्ष्म नियोजन केले. तसेच दर्जेदार उत्पादनांचा व न्यूट्रिशन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा यात मोठा वाटा राहिला. सुरुवातीला बागेत काही प्रमाणात असमानता होती. परंतु शास्त्रीय खत व्यवस्थापनात कारखान्याची २ टेलर मळी आणि ३ टेलर शेणखताचा वापर करण्यात आला. नियमित फवारण्या आणि बुंद्याला द्रव खतांचा वापर केल्याने झाडाच्या खोडाचा (बुंद्याचा) घेर तब्बल ५० इंचांपर्यंत वाढला. यामुळे घडाची लांबी आणि वजन वाढण्यास मदत झाली. ११ महिन्यांच्या कालावधीत ही बाग काढणीस आली. व्यापाऱ्यांनी थेट शेतावर येऊन बॉक्स पॅकिंग आणि कॅरेटद्वारे मालाची खरेदी केली. पहिल्या पिकाच्या यशानंतर पिसाळ यांनी याच बागेत खोडवा पिकाचेही उत्कृष्ट नियोजन केले असून, आगामी काळात आणखी दीड एकर क्षेत्रात केळीची नवी लागवड करण्याची तयारी सुरू केली आहे. ३५ गुंठ्यांतील केळीचे घसघशीत अर्थकारण हिंदुराव पिसाळ यांनी अवघ्या ३५ गुंठे क्षेत्रात ७ बाय ५ फूट अंतरावर केळीची १,१८० रोपे लावून लागवड केली होती. योग्य पाणी व खतांच्या सुक्ष्म नियोजनामुळे बागेतील एका-एका घडाचे वजन तब्बल ५० ते ५५ किलोपर्यंत भरले. अवघ्या ११ महिन्यांच्या कालावधीत ३५ गुंठ्यांतून ३७ ते ४० टनांचे विक्रमी उत्पादन मिळाले. या संपूर्ण प्रयोगासाठी एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा उत्पादन खर्च आला असून, त्यातून तब्बल ९ लाख ते ११ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सर्व खर्च वजा जाता पिसाळ यांच्या हाती ७ लाख ५० हजार ते ९ लाख ५० हजार रुपयांचा निव्वळ नफा उरला आहे.
—————————
शेतकरी मोबाइल नंबर : 9921500782
Source link
प्रगतिशील शेतकरी:पाणी, खताचे सुक्ष्म नियोजन, केळीच्या एका घडाचे वजन 55 किलोंवर; माळशिरस तालुक्यातील श्रीपूरच्या शेतकऱ्याचा प्रयोग