![]()
शालेय वयापासूनच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची ओढ निर्माण होणे गरजेचे आहे. प्रत्येक घटनेमागे कार्यकारणभाव असतो. त्यामुळे कोणत्याही घटनेकडे डोळसपणे पाहून तिच्यामागील वैज्ञानिक सत्य जाणून घ्यावे, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा प्रधान सचिव विनायक सापा यांनी केले. देवगाव येथील श्रीराम विद्यालयात अहिल्यानगर अंनिस शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी चमत्कार, भूतबाधा आणि श्रद्धेचा गैरवापर या विषयांवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. यावेळी सापा यांनी विविध चमत्कारिक प्रयोग सादर करून त्यामागील वैज्ञानिक कारणे उलगडून दाखवली. चमत्कारांच्या नावाखाली होणारी फसवणूक आणि अंधश्रद्धेचा फोलपणा कसा ओळखावा, याचेही त्यांनी दाखले दिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिलेखनवाडीचे सरपंच प्रा. भाऊसाहेब सावंत होते. प्रारंभी डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विज्ञान-गणित प्रदर्शन आणि रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती वाढवण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे आवश्यक आहे. अज्ञानामुळेच प्रगतीला खीळ बसते, असे मत प्रा. सावंत यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कचरदास गुंदेचा, सुखदेव फुलारी, प्राचार्य मच्छिंद्र शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. देवगाव सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष कदीरखान पठाण, केंद्रप्रमुख सीताराम आरगडे, शिक्षक डी. बी. मडके, तानाजी गुंजाळ, विशाल निकम, सतीश केदार आणि राजेंद्र धस उपस्थित होते. प्रास्ताविक सिकंदर शेख यांनी केले. स्वागत बाळासाहेब भगत यांनी केले, तर सूत्रसंचालन भरतसिंह परदेशी यांनी केले. प्रत्येक अंधश्रद्धेचा पडदा दूर करणारे प्रश्न! . काय घडले? : घटनेचे बारकाईने निरीक्षण करा. .असे का घडले? : त्यामागील कारण शोधण्याचा प्रयत्न करा. – .पुरावा काय? : कोणत्याही दाव्याची सत्यता तपासा. . वैज्ञानिक स्पष्टीकरण काय? : तर्क, निरीक्षण आणि प्रयोगांच्या आधारे निष्कर्ष काढा. . प्रयोगातून सत्य शोधा : चमत्कार वाटणाऱ्या कृतींचे निरीक्षणांच्या आधारे विश्लेषण करा. .वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासा : जिज्ञासा, तर्कशक्ती हीच विज्ञानाची खरी ताकद आहे.
Source link
चमत्कारांचा मुखवटा उतरला; विज्ञानाचे सत्य उलगडले:देवगाव येथील श्रीराम विद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन