Headlines

‘जंगल तोडणारे तुम्हीच महाराष्ट्रद्रोही’:आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, कर्जतच्या प्रकल्पाला विरोध कायम




रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित टोरेंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पावरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकल्पाच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ‘महाराष्ट्राची जंगलं नष्ट करणारे आणि आदिवासी पाडे उद्ध्वस्त करणारे तुम्हीच महाराष्ट्रद्रोही आहात,’ अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. विकासाला आमचा विरोध नाही; मात्र महाराष्ट्रातील जंगलांचा विनाश करून आणि स्थानिकांना विस्थापित करून विकास होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली. या वेळी खासदार संजय राऊत यांनीही पर्यावरणाच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला. ‘90 हजार झाडे लावण्याचे आश्वासन पुरेसे नाही’ कर्जत येथील प्रस्तावित प्रकल्पासाठी झाडे तोडली जाणार असून, त्याबदल्यात 90 हजार झाडे लावण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, केवळ नवीन झाडे लावण्याचे आश्वासन देऊन जुन्या जंगलांच्या नुकसानीची भरपाई होऊ शकत नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. आरे येथील मेट्रो कारशेडच्या वेळी झाडे तोडण्यात आली होती. त्यानंतर पर्यायी ठिकाणी लावलेली झाडे नेमकी कुठे आहेत आणि ती जगली की नाहीत, याची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. सरकारकडून कांदिवली आणि परिसरातील कांदळवनांवर परिणाम होत असल्याचा आरोप करताना त्यांनी चंद्रपूरमधील व्याघ्र मार्गिकांचाही उल्लेख केला. चंद्रपूरमध्ये झाडे लावण्याची घोषणा केली जाते; मात्र त्याच परिसरातील व्याघ्र मार्गिकांना धोका निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केला. सह्याद्रीतील जंगलतोडीचाही मुद्दा उपस्थित करत, जंगलांचे नुकसान करून नंतर वृक्षारोपण केल्याने मूळ जंगलाची भरपाई होत नाही, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी मुंबई क्लायमेट वीकदरम्यान 300 कोटी झाडे लावण्याची घोषणा केल्याचा उल्लेख करत ठाकरे यांनी या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘300 कोटी झाडे कुठे लावली, ते दाखवा,’ असे आव्हान त्यांनी दिले. जुन्या झाडांचे पर्यावरणीय महत्त्व वेगळे असते. त्यामुळे जंगल तोडून नवीन झाडे लावण्याचा पर्याय हा जंगल वाचवण्याला पर्याय ठरू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘प्रकल्पाचे पर्याय समोर मांडा, पारदर्शक चर्चा करा’ प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी पर्याय काय दिला, असा प्रश्न सरकारकडून उपस्थित केला जात असताना आदित्य ठाकरे यांनी प्रकल्पासाठी जागा निवडण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. एखाद्या कंपनीसाठी जागा निश्चित करताना सल्लागारांकडून अनेक पर्याय सुचवले जातात. कर्जतसह इतर कोणते पर्याय तपासण्यात आले आणि त्यापैकी याच जागेची निवड का करण्यात आली, याची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी त्यांनी केली. ‘मुख्यमंत्री आणि मी एकत्र बसू. तुम्हाला संबंधित विभागांना आणायचे असेल, तर तेही आणा. पारदर्शकपणे चर्चा करू आणि जनसुनावणी घेऊ,’ असे आव्हान ठाकरे यांनी दिले. प्रकल्पाबाबतचे सर्व पर्याय, पर्यावरणावरील परिणाम आणि स्थानिकांच्या हरकती यांची माहिती समोर आली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. प्रकल्पासाठी 18 महिने सुनावणी झाल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना ठाकरे यांनी या कालावधीत अनेक स्थानिकांनी, सरपंचांनी आणि ग्रामस्थांनी विरोध दर्शवला असल्याचे म्हटले. सूचना आणि हरकती मागवण्यामागचा उद्देश काय, असा सवाल करत त्यांनी स्थानिकांच्या आक्षेपांची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली. ‘मुख्यमंत्र्यांनी आम्हाला महाराष्ट्रद्रोही म्हणू नये’ प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना महाराष्ट्रद्रोही ठरवण्यात येत असल्याच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ‘महाराष्ट्राची जंगलं नष्ट करणारे तुम्हीच महाराष्ट्रद्रोही आहात. जंगलं आणि वनसंपदा नष्ट करणारे, आदिवासी पाडे उद्ध्वस्त करणारे तुम्ही महाराष्ट्रद्रोही आहात,’ असे ते म्हणाले. सरकारकडून विरोधकांवर फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा आरोप केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ५०० कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपचाही उल्लेख केला. या क्लिपमधील संभाषणाचा संदर्भ देत त्यांनी सरकारच्या आरोपांवर प्रश्न उपस्थित केले. तसेच विरोधकांना अर्बन नक्षल किंवा महाराष्ट्रद्रोही ठरवण्याऐवजी प्रकल्पाबाबतच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे त्यांनी सूचित केले. ‘कंपनीशी भांडण नाही; पर्यावरणाचा विनाश मान्य नाही’ टोरेंट पॉवर कंपनीशी आपला कोणताही वैयक्तिक किंवा व्यावसायिक संघर्ष नसल्याचे स्पष्ट करत आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात उद्योग आले पाहिजेत, गुंतवणूक वाढली पाहिजे आणि विकास झाला पाहिजे, अशी भूमिका मांडली. मात्र, विकासाच्या नावाखाली जंगलांचा नाश करणे आणि आदिवासींच्या वस्त्यांवर बुलडोझर चालवणे मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले. ‘आम्ही ग्रामस्थांसोबत आणि पर्यावरणासोबत राहू. महाराष्ट्र विकून चालणार नाही. इथली जंगलं नष्ट करून चालणार नाहीत आणि आदिवासी पाड्यांवर बुलडोझर चालवून कोणालाही काम करू देणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला. या प्रकल्पाविरोधातील आंदोलन ही केवळ सुरुवात असून, स्थानिकांच्या प्रश्नांसाठी पुढेही भूमिका घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक आमदारांवरही निशाणा या वेळी आदित्य ठाकरे यांनी कर्जत परिसरातील स्थानिक आमदारांवरही टीका केली. स्थानिक आमदारांनी आपल्या कार्यकाळात विकास झाला नसल्याचा आरोप विरोधकांवर केला जात असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी आमदारांच्या उद्योगक्षेत्रातील कथित हितसंबंधांबाबत प्रश्न उपस्थित केले. स्थानिक मतदारसंघात जंगलतोड होत असताना, ग्रामस्थांना घराबाहेर काढले जात असल्याचे आरोप होत असताना आणि आदिवासी पाड्यांवर परिणाम होत असताना लोकप्रतिनिधींची भूमिका काय आहे, असा सवाल त्यांनी केला. उद्योगांमधील स्वारस्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांमध्ये किती स्वारस्य आहे, हे स्थानिक आमदारांनी स्पष्ट करावे, असे आव्हानही त्यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावित भेटीच्या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, ठाकरे यांनी हिंजवडी मेट्रोच्या कामाचाही उल्लेख केला. संबंधित भेट रद्द झाल्याचे सांगत त्यांनी हिंजवडी मेट्रो सुरू होण्यासही विलंब होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. ‘अभ्यासपूर्ण बोला म्हणत असाल तर चर्चा करायला तयार’ भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांनी आदित्य ठाकरे प्रकल्पाबाबत अभ्यासपूर्ण बोलत नसल्याचा आरोप केल्याचा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. त्यावर ‘चला, पेपर समोर आणा. अभ्यास करू, पाठांतर करू,’ असे प्रत्युत्तर देत ठाकरे यांनी या मुद्द्यावर चर्चा करण्याची तयारी दर्शवली. प्रकल्पासंदर्भात सरकारकडून मांडण्यात येणारी माहिती, पर्यावरणावरील परिणाम आणि स्थानिकांच्या हरकती यांवर खुली चर्चा व्हावी, अशी त्यांची भूमिका होती. ‘एक पेड माँ के नाम’चा दाखला देत संजय राऊत यांची टीका खासदार संजय राऊत यांनीही या वेळी सरकारवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानातून आईच्या नावाने झाड लावण्याचा संदेश दिला आहे. मग हजारो झाडे तोडली जात असताना त्या झाडांना आईसमान का मानले जात नाही, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. पंतप्रधान वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत असताना राज्य सरकारकडून झाडे तोडली जात असल्याचा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. उद्योगांना शिवसेनेचा विरोध नाही; मात्र ग्रामस्थांचा विरोध असताना आणि पर्यावरणाचे नुकसान होत असताना प्रकल्प राबवला जात असेल, तर शिवसेना सक्रिय भूमिका घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. बाळासाहेब ठाकरे यांची उद्योग आणि विकासाबाबतची भूमिका सांगताना राऊत यांनी उद्योगपती राज्याच्या विकासात योगदान देतात, हे मान्य केले. मात्र, विकासाच्या नावाखाली विनाश होता कामा नये, असे ते म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पुढे वेग येईल, असा दावाही त्यांनी केला. पत्रकारांनी वनमंत्र्यांच्या भूमिकेबाबत विचारले असता, ‘तुम्हाला आपल्या वनमंत्र्यांचे नाव माहिती आहे का?’ असा उपरोधिक प्रश्न राऊत यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला. कर्जतच्या प्रस्तावित प्रकल्पावरून आता पर्यावरण संवर्धन, स्थानिकांचे हक्क आणि औद्योगिक विकास या मुद्द्यांवरून राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. प्रकल्पाबाबत सरकारची भूमिका, पर्यावरणीय परिणाम आणि ग्रामस्थांच्या हरकती यांवर पुढील काळात काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. हेही वाचा… ‘आमच्याकडे आणखी पुरावे, पुढचे पाऊल उचलायला भाग पाडू नका’:मनोज जरांगेंचा सरकारला इशारा; म्हणाले- आता सहन होत नाही कथित ऑडिओ क्लिप आणि राजकीय षड्यंत्राच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. ‘आमच्याकडे आणखी पुरावे असून, आम्हाला पुढचे पाऊल उचलायला भाग पाडू नका,’ असा सज्जड दम त्यांनी भरला आहे. तसेच, भाजपच्या पडद्यामागच्या राजकारणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, एका मोठ्या नेटवर्कमधील महिलेच्या दाव्यामुळे झालेले नुकसान ते खपवून घेणार नाहीत, असा मोठा दावा जरांगे यांनी केला आहे. मराठा समाजाने हे सत्य उघडकीस आणून शिंदेंची बदनामी टाळली असल्याने, त्यांनी समाजाचे आभार मानावेत, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *