![]()
ओडिशातून १२ किलो गांजा घेऊन जात असताना पुणे शहर पोलिसांच्या वाहतूक विभागातील शिपायाला तेलंगणा पोलिसांनी अटक केली. नितीन ज्ञानू शिंदे असे त्याचे नाव आहे. तो गेल्या दीड वर्षापासून विश्रामबाग वाहतूक विभागात कार्यरत होता. या घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्याला तत्काळ निलंबित केले असून, सेवेतून बडतर्फ करण्याचीही तयारी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन शिंदे हा गांजा घेऊन ओडिशातून दुसऱ्या राज्यात जात होता. दरम्यान, तेलंगणातील वारंगल जिल्ह्यातील पोलिसांना एका व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात गांजा असल्याची माहिती मिळाली. संबंधित व्यक्ती बसस्थानकाजवळ असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन तपासणी केली. पोलिसांना पाहताच शिंदे याने पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या बॅगेची झडती घेतली. त्यात १२ किलो गांजा आढळला. चौकशीत तो पुणे शहर पोलिस दलात शिपाई म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले. या प्रकरणी वारंगल जिल्ह्यातील नेक्कोंडा पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस दलातील कर्मचाऱ्यालाच गांजासह अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. गॅरेज चालकाकडे खंडणी मागणारा अटकेत गॅरेज चालकाकडे दरमहा पाच हजार हप्ता देण्याची मागणी करणाऱ्या सराइताला नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली. सुमीत उर्फ बंटी रणजीत गायकवाड (वय २४, रा. नांदेड फाटा, सिंहगड रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका गॅरेज चालकाने नांदेड सिटी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणाचे सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा परिसरात गॅरेज आहे. गायकवाड तक्रारदार तरुणाच्या गॅरेजमध्ये आला. त्याच्याकडे कोयता होता. तक्रारदार तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून आरोपीने त्याला १५ हजार रुपये देण्याची मागणी केली, तसेच त्याला दरमहा पाच हजार रुपये हप्ता मागितला. तक्रारदार तरुणाने नकार दिल्यानंतर आरोपीने काेयता उगारुन दहशत माजविली. घाबरलेल्या तक्रारदाराने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पसार झालेला आरोपी गायकवाड याला पोलिसांनी अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत तपास करत आहेत.
Source link
12 किलो गांजासह पुणे पोलिसांचा शिपाई अटकेत:आयुक्त अमितेश कुमार यांनी केले निलंबित; सेवेतून बडतर्फ करण्याची तयारी