![]()
मतदार याद्यांमधून मनमानी पद्धतीने नावे वगळून नागरिकांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतल्याच्या प्रकारांची सखोल चौकशी करावी. या प्रकरणात जबाबदारी निश्चित करून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून दूर करावे आणि त्यांच्याविरुद्ध न्यायालयीन कार्यवाही करावी, अशी मागणी कर्नाटकातील हनगल विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे निरीक्षक श्रीनिवास माने यांनी केली. काँग्रेसच्या ‘मत वाचवा, देश वाचवा’ या देशव्यापी अभियानाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या वेळी माने यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. काँग्रेस पक्षाकडून इंडिया आघाडीतील सहयोगी पक्षांच्या समन्वयाने १ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर राष्ट्रीय रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. संवैधानिक संस्थांच्या कथित गैरवापराविरोधात आवाज उठवण्यासाठी तसेच देशातील एकजूट दर्शवण्यासाठी या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. माने म्हणाले, ‘‘भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३२६ नुसार मतदानाच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करण्याची लढाई निर्णायक टप्प्यावर आली आहे. मतदार याद्यांमधून मनमानी पद्धतीने नावे वगळल्यामुळे मतदारांचा वैधानिक हक्क हिरावला जात असल्याचा मुद्दा गंभीर आहे. या प्रकारांची संपूर्ण चौकशी करून जबाबदारी निश्चित होईपर्यंत हा लढा सुरू ठेवावा लागेल.’’ मतदानाच्या हक्काच्या संरक्षणासाठी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. ही बैठक पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चौधरी आणि पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार उल्हास पवार, पुणे महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते रामचंद्र ऊर्फ चंदूशेठ कदम, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, सुनील मलके, नगरसेवक साहिल केदारी, तस्लीम शेख, माजी नगरसेवक अविनाश बागवे, लता राजगुरू, उस्मान तांबोळी, कैलास गायकवाड, चंद्रशेखर कपोते, राजाभाऊ कदम, सचिन आडेकर, राजेंद्र शिरसाट, लतेंद्र भिंगारे, संतोष डोख, सुरेश नांगरे, धीरज खोरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Source link
मतदार याद्यांतील फेरफाराची चौकशी करा:मुख्य निवडणूक आयुक्तांवर कारवाई करा, काँग्रेसची 1नोव्हेंबरला दिल्लीत रॅली