![]()
वाल्हेकरवाडी येथे महादेव मंदिराजवळील उड्डाणपुलाच्या परिसरात कचरा जाळल्याने महावितरणच्या दोन उच्चदाब भूमिगत वीजवाहिन्यांच्या केबल जळाल्या. सोमवारी (दि. २६) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे ताथवडे आणि पुनावळे परिसरातील सुमारे १५ ते १६ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांकडून दुरुस्तीचे काम सुरू आहे. महादेव मंदिराजवळील उड्डाणपुलाच्या परिसरात अज्ञात व्यक्तीने कचरा जाळला. या आगीची झळ टाको-1 आणि टाको-2 या उच्चदाब भूमिगत वीजवाहिन्यांच्या चालू आणि पर्यायी अशा दोन्ही २२ केव्ही इनकमर केबलना बसली. त्यामुळे २२/११ केव्ही बेंचमार्क आणि पेठकर उपकेंद्रांतून निघणाऱ्या ११ केव्ही वीजवाहिन्यांचा पुरवठा पूर्णपणे खंडित झाला. पुणे-मुंबई महामार्गाच्या पश्चिमेकडील ताथवडे आणि पुनावळे परिसराला या बिघाडाचा फटका बसला. चालू वीजवाहिनीसोबतच पर्यायी वाहिनीची केबलही जळाल्याने दुसऱ्या मार्गाने वीजपुरवठा सुरू करणे शक्य झाले नाही. त्यामुळे बाधित केबल जोडणे आणि वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. वीजवाहिन्यांजवळ कचरा जाळू नका उच्चदाब भूमिगत वीजवाहिन्या, वीज केबल्स तसेच वीजयंत्रणेजवळ कचरा जाळल्यामुळे केबल्सचे नुकसान होऊन मोठ्या परिसरातील वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. अशा घटनांमुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो, तसेच महावितरणच्या वीजयंत्रणेचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी वीजवाहिन्या, भूमिगत केबल मार्ग आणि विद्युत यंत्रणेजवळ कचरा जाळू नये. कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून महावितरणच्या वीजयंत्रणेची सुरक्षितता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
Source link
कचरा जाळल्याने भूमिगत वीजवाहिन्या जळाल्या:ताथवडे-पुनावळेतील 16 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित, दुरुस्ती सुरू