![]()
एकीकडे भीषण दुष्काळाने शेतीचे कंबरडे मोडले असून खरीप हंगाम हातातून गेला आहे, तर दुसरीकडे रब्बी हंगामातील पेरणीची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. अशा बिकट परिस्थितीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पूर्ण केलेल्या कामांचा मोबदला वेळेवर मिळत नसल्याने सोयगाव तालुक्यातील शेतकरी, मजूर आणि लाभार्थी आर्थिक संकटात सापडले आहेत. सोयगाव तालुक्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक अशा १,६१३ कामांची २ कोटी ४३ लाख ३२ हजार ४५५ रुपयांची देयके प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. या थकबाकीमध्ये १,५४० वैयक्तिक कामांचे १ कोटी ६४ लाख ९० हजार ५२२ रुपये आणि ७३ सार्वजनिक कामांचे ७८ लाख ४१ हजार ९३३ रुपये अडकले आहेत. अनेक लाभार्थ्यांनी खासगी व्याजाने कर्जे काढून तसेच उधारीवर साहित्य आणून कामे पूर्ण केली; मात्र वेळेत पैसे न मिळाल्याने त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढू लागला आहे. मनरेगाअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या कामांमध्ये सिंचन विहिरींचा मोठा वाटा आहे. दुष्काळात सिंचनाची सोय व्हावी यासाठी उभारलेल्या तालुक्यातील ४१७ सिंचन विहिरींची १ कोटी २६ लाख ४४ हजार ७५६ रुपयांची देयके थकीत आहेत. याशिवाय १,०५५ गायगोठ्यांची २६ लाख ६५ हजार ८१९ रुपये आणि ६८ वृक्षलागवडीच्या कामांची ११ लाख ७९ हजार ९४७ रुपयांची बिले रखडली आहेत. वैयक्तिक कामांची एकूण थकबाकी १ कोटी ६४ लाख ९० हजार ५२२ रुपयांवर पोहोचली असल्याने लाभार्थ्यांची वसुली कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच तालुक्यातील ७३ सार्वजनिक कामांचे ७८ लाख ४१ हजार ९३३ रुपये अडकल्याने साहित्य पुरवठादार आणि कंत्राटदार यांच्या दैनंदिन व्यवहारांवर विपरीत परिणाम झाला आहे. पुढे रोजगाराच्या नवीन घोषणा होत असताना जुन्या बिलांचा डोंगर कायम असल्याने नव्याने कामे सुरू करण्यास कोणीही पुढाकार घेत नाही. मनरेगाअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या कामांमध्ये सिंचन विहिरींचा मोठा वाटा आहे २०२५ पासून विहिरीचे पैसे मिळेनात किन्ही येथील लाभार्थी अल्काबाई रावसाहेब झाल्टे म्हणाल्या की, किन्ही शिवारातील गट क्रमांक १७० मध्ये मनरेगाअंतर्गत सिंचन विहिरीचे काम मार्च २०२५ पूर्वीच पूर्ण केले. विहिरीसाठी उसने पैसे घेतले होते, परंतु २० महिन्यांपासून पंचायत समितीच्या चकरा मारूनही पैसे मिळालेले नाहीत. दुष्काळात शेतीतून उत्पन्न नाही आणि हक्काचे पैसेही मिळत नसल्याने दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न असून शासनाने ही देयके तातडीने अदा करावीत अशी मागणी आहे. दुष्काळात हाताला काम नाही आणि केलेल्या कामाचा मोबदलाही थकीत असल्याने शेतकरी व मजूर अडकले आहेत.
Source link
सोयगाव तालुक्यात मनरेगाच्या 1,613 कामांचे 2कोटी 43लाख रुपये थकीत:शासनाने कामाचा मोबदला तात्काळ देण्याची लाभार्थींची मागणी