![]()
मोर्शीजवळ दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एक ट्रक उलटून त्याचा क्लिनर जखमी झाला, तर दुसऱ्या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. हे अपघात मोर्शी-अमरावती रोड आणि मोर्शी-चांदूरबाजार रोडवर घडले. पहिला अपघात शनिवारी (२५ एप्रिल) सकाळी ७.३० वाजता मोर्शी ते अमरावती रोडवरील मडघे मंगल कार्यालयासमोर झाला. अमरावतीहून छत्तीसगडकडे सरकीचे पोते घेऊन जाणारा आयशर ट्रक (क्र. RJ 21 GC 1929) चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात ट्रकची केबिन पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि सरकी रस्त्यावर विखुरली. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. ट्रकचा क्लिनर रघुवीर शेखावत (वय २८, रा. नागोर, राजस्थान) याच्या पायाला गंभीर दुखापत झाली, तर चालकाला किरकोळ मार लागला. जखमी क्लिनरला तातडीने मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. उलटलेला ट्रक क्रेनच्या साहाय्याने उभा करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. मोर्शीचे ठाणेदार राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण चिंचोळे या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसरा अपघात शुक्रवारी रात्री उशिरा मोर्शी ते चांदूरबाजार रोडवरील रेल्वे गेटजवळील गतिरोधकावर झाला. बोरिंगचे काम करणारा मजूर विघ्नेश्वर सर्वानंद ठाकूर (वय २७, रा. डींडीगुल, तामिळनाडू) आपली मोटरसायकल (क्र. MH 27 DR 6757) घेऊन चांदूरबाजारकडे जात असताना गतिरोधकावर आदळला. या अपघातात विघ्नेश्वरच्या डोक्याला गंभीर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण चिंचोले आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमी विघ्नेश्वरला तातडीने मोर्शीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर पुढील उपचारांसाठी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले.
Source link
मोर्शीजवळ दोन अपघात:सरकीचा ट्रक उलटला, क्लिनर जखमी; दुचाकी अपघातात एकजण गंभीर