![]()
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता 9 महिने पूर्ण होत आहेत. या अपघाताचा तपास सध्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) सुरू आहे. याच तपासाच्या अनुषंगाने अजित पवार यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. जय पवार यांनी सीआयडी अधिकाऱ्यांसोबत 5 ते 10 मिनिटे चर्चा करून या अपघात प्रकरणाच्या तपासाचा सविस्तर आढावा घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी तपासाची सद्यस्थिती, आतापर्यंत झालेली कार्यवाही आणि प्रलंबित बाबींबाबत अधिकाऱ्यांकडे सविस्तर विचारणा केली. तसेच, हा तपास पूर्ण होण्यासाठी आणखी किती कालावधी लागेल, याचीही माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. तपासाला गती देण्याची मागणी अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासाला अधिक गती देण्याची प्रमुख मागणी जय पवार यांनी यावेळी अधिकाऱ्यांकडे केली. हा तपास पूर्णपणे पारदर्शकपणे आणि कोणत्याही प्रकारचा विलंब न लावता तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी प्रकर्षाने अधोरेखित केले. लाखो नागरिकांच्या विश्वासाचा विषय या अपघातामागील सत्य समोर येणे हा केवळ एका कुटुंबाचा प्रश्न नसून, अजितदादांवर अपार प्रेम करणाऱ्या लाखो नागरिकांच्या विश्वासाचा विषय आहे, अशी भूमिका जय पवार यांनी मांडली. या दुर्घटनेबाबत जनतेच्या मनात अनेक प्रश्न असून, तपासातील प्रत्येक महत्त्वाच्या बाबीचा सखोल तपास होऊन सत्य जनतेसमोर येणे अत्यंत आवश्यक असल्याचे ते म्हणाले. तपासात कोणतीही दिरंगाई न होता दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सत्य समोर येईपर्यंत पाठपुरावा करणार- जय पवार या बैठकीच्या वेळी जय पवार यांच्यासोबत आमदार विक्रम काकडे हे देखील उपस्थित होते. अजितदादांच्या अपघाताचे खरे कारण आणि सत्य जोपर्यंत समोर येत नाही, तोपर्यंत या प्रकरणाचा आपण सातत्याने पाठपुरावा करत राहू, असा ठाम निर्धार जय पवार यांनी सीआयडी कार्यालयातून बाहेर पडताना व्यक्त केला. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. अजित पवारांचा घात की अपघात?:सुरज चव्हाण यांचा सवाल; म्हणाले- अपघाताला 9 महिने उलटूनही चौकशी अहवाल नाही महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला 9 महीने पूर्ण होत आहेत. अद्यापही या अपघाताच्या चौकशीचा अहवाल समोर आलेला नाही. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते व प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजितदादांचा घात की अपघात? हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आले पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. वाचा सविस्तर
Source link
अजित पवार विमान अपघात प्रकरण:जय पवारांनी घेतली CID अधिकाऱ्यांची भेट; म्हणाले- सत्य समोर येईपर्यंत पाठपुरावा करणार