![]()
येथील प्रभाग क्रमांक ५ मध्ये १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून सुरू झालेल्या भुयारी गटारकामाच्या तांत्रिक नियोजनावरून वाद निर्माण झाला आहे. पाईपची खोली, सांडपाण्याचा उतार आणि चेंबरच्या जागेबाबत नागरिकांनी आक्षेप घेत कामाच्या फेरतपासणीची मागणी केली आहे. हे काम अंदाजे ८ ते १० लाख रुपयांचे आहे. कामाच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाने योग्य त्या तांत्रिक सूचना दिल्याचे स्पष्ट केले आहे. तांत्रिक त्रुटी दूर करण्याची मागणी : केवळ नारळ फोडून विकास होत नाही. कामातील तांत्रिक त्रुटी दूर करून अनुभवी अभियंत्यामार्फत फेरतपासणी करावी. अन्यथा काम थांबवावे, अशी मागणी प्रभाग ५ मधील तरुण आणि रहिवाशांनी केली आहे. भविष्यात पाणी साचणे आणि सांडपाणी घरांत शिरणे यांसारख्या समस्या उद्भवू नयेत, अशी त्यांची भूमिका आहे. दोन फूट खोलीचा निकष न पाळल्याचा आरोप नागरिकांच्या दाव्यानुसार, पाईपलाईन दोन फूट खोल टाकली जात असून, तीन घरांसाठी एकच ड्रेनेज लाईन केली जात आहे. भविष्यात रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्यास सांडपाणी घरांत शिरण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच, रस्त्याची रुंदी १२ फुटांवरून आठ फुटांपर्यंत कमी झाल्याचा आणि चेंबरमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याचा दावा केला आहे. पावसाचे पाणी साचू नये, यासाठी योग्य उतार देण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे.
Source link
नका करू असा विकास, जुनीच गटार बरी; जायखेड्यात कामावर संताप:भूमिगत गटारीचा उतार आणि चेंबरवर नागरिकांनी घेतला आक्षेप