![]()
घराच्या अंगणात शेकोटी पेटवून कुटुंबीयांसोबत जेवण करत असताना पैशाच्या वादातून मद्यधुंद मुलाने जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेकोटीतील जळत्या लाकडाने डोक्यावर जोरदार प्रहार केल्यामुळे वडिलांचा जागीच मृत्यू झाला. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना कुरखेडा तालुक्यातील चारभट्टी येथील बिरसानगरमध्ये बुधवारी (२९ ऑक्टोबर) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. मनोहर निरंगशहा गोटा (५१) असे मृत पित्याचे नाव असून, नागेश मनोहर गोटा (२९) असे आरोपी मुलाचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी परिसरात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे गोटा कुटुंबीयांनी घराच्या अंगणात शेकोटी पेटवली होती. शेकोटीभोवती बसून सगळे जेवण करत असताना मनोहर आणि नागेश यांच्यात पैशाच्या कारणावरून वाद सुरू झाला. शाब्दिक चकमकीतून हा वाद विकोपाला गेला. नागेश अतिशय मद्यधुंद अवस्थेत असल्याने संतापाच्या भरात त्याने शेकोटीतील जळते लाकूड उचलून वडिलांच्या डोक्यात मारले. या गंभीर हल्ल्यात अत्यंत रक्तबंबाळ होऊन मनोहर गोटा खाली कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पुराडा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुरखेडा ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी मुलगा नागेश गोटा याला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास पुराडा पोलीस करत आहेत.
Source link
पैशांच्या वादातून मुलाने जळते लाकुड मारून पित्याची केली हत्या:गडचिरोलीतील कुरखेडा येथील घटना