![]()
भूजलपातळी कमालीची खालावल्याने आणि अनुकूल हवामानाच्या अभावामुळे पिंपळदरी परिसरातील शेतातील पिके सुकण्याच्या मार्गावर लागली आहेत. त्यामुळे स्थानिक बळीराजाची चिंता प्रचंड वाढली आहे. यंदाच्या मान्सून हंगामात झालेला अत्यल्प पाऊस, वेगाने खालावलेली भूजलपातळी आणि ऑक्टोबर महिना संपत आला तरीही थंडीचा असलेला अभाव अशा तिहेरी प्रतिकूल परिस्थितीचा भीषण फटका आता तूर पिकाला बसू लागला आहे. यंदा वेळेवर व पुरेसा पाऊस न झाल्याने आधीच मका, सोयाबीन, कपाशी आदी मुख्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ आता हातातोंडाशी आलेले तुरीचे पीकही पूर्णपणे धोक्यात आले आहे. तीव्र पाण्याची टंचाई आणि थंडीचा अभाव यामुळे तुरीच्या नैसर्गिक वाढीवर विपरीत परिणाम होत असून शेतातील पीक वाळून सुकू लागल्याचे विदारक चित्र ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे चालू हंगामात संपूर्ण जिल्ह्यात तुरीच्या एकूण उत्पादनात मोठी घट होण्याची दाट शक्यता कृषी वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. सध्याच्या काळात तूर पिकाला पाण्याची सर्वाधिक गरज असते. परंतु याच निर्णायक परिस्थितीत जमिनीत ओलावा नसल्याने तूर सुकण्याच्या मार्गावर असून, यामुळे परिसरातील हजारो शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. पावसाने दिलेली ओढ आणि भूजलपातळीत झपाट्याने झालेली घसरण यांमुळे शेतात उभ्या असलेल्या तूर पिकाला पाण्याचा प्रचंड ताण जाणवत आहे. त्यातच तुरीसाठी आवश्यक असणारी थंडी अजूनही सुरू न झाल्याने पिकांच्या वाढीवर आणि प्रक्रियेवर मोठा परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. पाण्याअभावी उभी पिके डोळ्यांदेखत सुकत असल्याने बळीराजाचे संपूर्ण आर्थिक गणितच कोलमडून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदाच्या हंगामात चांगले उत्पादन मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तूर पिकाची लागवड केली होती. तुरीच्या पिकाला थंडीचा अभाव ठरणार घातक ऑक्टोबर महिना संपत आला तरी हवामानात अपेक्षित थंडी जाणवत नाही. तुरीच्या वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या महत्त्वाच्या काळात तापमानातील हा प्रतिकूल बदल अत्यंत घातक ठरू शकतो. पाणीटंचाई आणि हे विषम हवामान असेच कायम राहिल्यास तुरीच्या उत्पादनात कमालीची घट होईल. अल्प पावसामुळे बहुतांश भागातील विहिरींनी तळ गाठला आहे. त्यातच एल निनोचा संभाव्य प्रभाव आणि दुष्काळसदृश परिस्थिती यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे.
Source link
पिंपळदरीत तूर पिकावर दुष्काळाचे सावट:पाऊस नसल्याने यंदा खरिपामधील उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता