Headlines

वन विभागाचे दुर्लक्ष:सोयगावच्या वनक्षेत्रात सागवानासह डेरेदार झाडांची अवैध वृक्षतोड सुरूच




एकीकडे राज्य शासनाकडून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व वृक्षसंवर्धनासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. झाडे लावा, झाडे जगवा आणि एक पेड माँ के नाम यांसारख्या मोहिमा सरकारी स्तरावर राबवून कोट्यवधी खर्च केले जात आहेत. परंतु, दुसरीकडे सोयगाव तालुक्यातील वनक्षेत्रात मात्र या मोहिमांचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. तालुक्यातील जंगलांमध्ये सागवानासह अनेक डेरेदार वृक्षांची अवैध तोड सुरू असून लाकूडतस्करांचे धाडस वाढले आहे. याकडे वन विभागाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. बनोटी वनपरिमंडळाच्या कार्यक्षेत्रात सागवानाची झाडे तोडून लाकडाची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याचा गंभीर प्रकार रविवारी उघडकीस आला. या घटनेला पाच दिवस उलटून गेले, तरीही वनविभागाने संबंधित दोषींवर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. बनोटी वनपरिमंडळातील जंगल परिसरात ठिकठिकाणी कुऱ्हाडीने छाटलेल्या सागवानाच्या झाडांचे बुंधे व खोडे दिसून येत आहेत. वनसंपत्तीचे रक्षण करणे, तस्करांवर वचक ठेवणे आणि जंगलाचे जतन करणे ही प्राथमिक जबाबदारी वनविभागाची आहे. मात्र, प्रत्यक्ष वनविभागाच्या समोरच ही वृक्षतोड सुरू असल्याने वनरक्षक आणि वनपाल यांच्या गस्तीवर तसेच त्यांच्या देखरेखीवर शंका व्यक्त केली जात आहे. सध्या पावसाची ओढ, वाढणारे तापमान आणि भीषण दुष्काळाचे संकट यामुळे तालुका होरपळून निघत आहे. अशा गंभीर परिस्थितीत होत असलेल्या बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ढासळता समतोल बिघडून दुष्काळाची तीव्रता वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. बनोटीच नव्हे, तर यापूर्वी शुक्रवारी जंगली कोटा शिवारात अखंडितपणे लाकूडतोड सुरू असल्याचा प्रकार उघड झाला होता. वनसंरक्षकांकडे तक्रार करण्यात येणार सोयगाव तालुक्यात सुरू असलेल्या या कथित अवैध वृक्षतोडीप्रकरणी आणि अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेविरोधात आता वृक्षप्रेमी आक्रमक झाले आहेत. वनपरिक्षेत्राधिकारी अनिल मिसाळ, वनपाल गणेश सपकाळ आणि संबंधित वनरक्षकांविरोधात थेट प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास राव यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचे वृक्षप्रेमी संदीप चव्हाण आणि रवींद्र राठोड यांनी स्पष्ट केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *