Headlines

बावनकुळेंनी महायुतीच्या पक्षांना आत्मचिंतनाचा सल्ला दिला:पुणे-नागपूर पदवीधर मतदारसंघांतील पराभवाची कारणे शोधणार; विरोधात काम करणाऱ्यांवर योग्य वेळी निर्णय घेणार




पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघांतील पराभवाची कारणे शोधून त्यांचा सविस्तर अभ्यास केला जाईल. महायुतीतील पक्षांनी आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी आत्मचिंतन करावे, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी सांगितले. पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्यांबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले. पुण्यातील पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. पुणे आणि नागपूरच्या जागा यापूर्वी काँग्रेसकडे होत्या. यंदा त्या जिंकण्यासाठी प्रयत्न केले आणि प्रत्येक पदवीधर मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी सांगितले. काही उणिवा राहिल्या असतील, त्या दूर करून पुढील निवडणुकीत या जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करू, असे बावनकुळे म्हणाले. या निवडणुकीचा प्रभारी म्हणून आपली जबाबदारी स्वीकारत असल्याचेही त्यांनी सांगितले. फडणवीसांना लक्ष्य करणे योग्य नाही नागपूर मतदारसंघात ३८ आमदार आहेत. हा मतदारसंघ केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाही. त्यामुळे पराभवासाठी त्यांना लक्ष्य करणे योग्य नाही, असे बावनकुळे म्हणाले. बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तरी आम्ही जिंकू शकतो, असा दावा त्यांनी केला. महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आले तेव्हा ईव्हीएम योग्य आणि पराभव झाला की मशीनमध्ये दोष, अशी भूमिका घेणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. नागपूरमध्ये पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये आम्ही आघाडीवर होतो; मात्र, दुसऱ्या पसंतीच्या मतांमुळे काँग्रेसचा विजय झाला, असा दावा बावनकुळे यांनी केला. मतदारयाद्या वारंवार बदलण्याऐवजी त्या अद्ययावत करण्यावर भर द्यावा, असे ते म्हणाले. पुणे शिक्षक मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत झाली होती. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी बोलताना स्वतःची उंची समजून घ्यावी, असे बावनकुळे म्हणाले. राज्यातील जनतेने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, असा कौल दिला आहे. धंगेकर यांनी जनमत समजून घ्यावे आणि एकनाथ शिंदे यांनीही त्यांना समजावून सांगावे, असे ते म्हणाले. पुणे पदवीधर मतदारसंघातील विजयाचा उल्लेख करताना बावनकुळे यांनी लाड यांच्या विजयाचाही संदर्भ दिला. अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी वेगाने करा अजित पवार यांच्या विमान अपघातामागचे नेमके कारण जनतेसमोर आले पाहिजे. या प्रकरणाची चौकशी वेगाने आणि लवकर पूर्ण व्हावी, यासाठी प्रयत्न करू, असे बावनकुळे यांनी सांगितले. जलविद्युत प्रकल्प राज्याच्या विकासासाठी आवश्यक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्जतसारख्या प्रकल्पांबाबत केलेल्या राजकीय भाषणावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, राज्यात अशा प्रकारचे ५० प्रकल्प उभे राहिले तरी त्यांचा विचार केला पाहिजे. कोयना प्रकल्पामुळे राज्यातील नागरिकांना कमी दरात वीज मिळते. जलविद्युत प्रकल्प पर्यावरणपूरक आहेत, तर कोळशापासून वीज तयार करताना मोठ्या प्रमाणात राख निर्माण होऊन प्रदूषण होते, असे त्यांनी सांगितले. माझ्या घरावर दररोज किलोभर राख साचते, असेही बावनकुळे म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *