![]()
आयकर विभागात नोंदणी केल्यामुळे तिवसा तालुक्यातील ७०० नागरिकांसह अमरावती जिल्ह्यातील सुमारे १२ हजार रेशन कार्डधारकांचे धान्य बंद झाले आहे. या लाभार्थ्यांची नावे रेशनच्या यादीतून कमी करण्यात आली आहेत. ‘मिशन सुधार’अंतर्गत ही कारवाई सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांमध्ये याचा परिणाम झाला आहे. काही ठिकाणी रेशन दुकानदार आणि नागरिकांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे. तिवसा शहरातील १५० लाभार्थी रेशनपासून वंचित झाले आहेत. गुरुदेवनगर आणि मोझरी येथील प्रत्येकी ४०, वऱ्हा-कुऱ्हा परिसरातील ६०, तर जहांगीरपूर येथील ३० नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. कौंडण्यपूर, शिरजगाव, तळेगाव ठाकूर, रघुनाथपूर, मालधुर, शिवणगाव, डेहनी, मार्डी आणि शेंदोळाखुर्द येथील लाभार्थ्यांचेही रेशन बंद झाल्याचे तिवसा तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा निरीक्षक शीतल आंबटकर यांनी सांगितले. काही कुटुंबांतील सदस्यांनी कर्जासाठी पत तयार करण्याच्या उद्देशाने आयकर विभागात नोंदणी केली होती. त्यांनी कर्ज घेऊन कुटुंबाचा खर्च भागवला. काहींनी वाहनांसाठी कर्ज घेतले आहे. वाहनांचे हप्ते, इंधन, दुरुस्ती आणि घरखर्चामुळे त्यांची आर्थिक ओढाताण सुरू आहे. त्यात रेशन बंद झाल्याने अडचण वाढली आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या मते, केवळ आयकर विभागाच्या यादीत नाव आहे किंवा घरी चारचाकी वाहन आहे म्हणून रेशन बंद करणे योग्य नाही. लाभार्थ्यांची आर्थिक स्थिती, उत्पन्नाचे स्रोत आणि पात्रतेचे निकष तपासण्याची मागणी त्यांनी केली आहे. सुनील मेटकर, जिल्हा सचिव, भाकप दुष्काळात रेशन बंद करू नका अमरावती जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे. अपुरा पाऊस आणि पिकांचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्रासह अमरावतीत दुष्काळ मान्य केला आहे. अशा परिस्थितीत रेशन बंद करू नये, असे सुनील मेटकर यांनी म्हटले आहे. नागरिकांच्या पाठिशी उभे राहण्याचे सांगत असताना रेशन बंद करणे हा विरोधाभास असल्याचेही त्यांनी म्हटले. रेशनचा लाभ घेण्यासाठी अर्ज करा “आयकर विभागाच्या यादीत नाव असलेल्या कुटुंबातील संबंधित सदस्याचे नाव रेशन कार्डवरून कमी करून उर्वरित सदस्यांना रेशनचा लाभ घेता येऊ शकतो. यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात नाव कमी करण्यासाठी अर्ज द्यावा,” असे तिवसा येथील पुरवठा निरीक्षक शीतल आंबटकर यांनी सांगितले.
Source link
आयकर नोंदणीमुळे 12 हजार रेशनधारकांचे धान्य बंद:अमरावती जिल्ह्यातील यादीतून नावे कमी; तिवसा तालुक्यातील 700 नागरिकांचा समावेश