Headlines

पुण्यात तीन रस्त्यांवर दिवाळीसाठी रोषणाई:आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते उद्घाटन; व्यापारी संघटनांचा सलग तिसऱ्या वर्षी उपक्रम




पुण्यातील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर दिवाळीनिमित्त केलेल्या विद्युत रोषणाईचे उद्घाटन गुरुवारी पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते झाले. पुणे व्यापारी महासंघ, युनायटेड रिटेल ट्रेड गारमेंट असोसिएशन आणि पुणे सराफ असोसिएशन यांनी सलग तिसऱ्या वर्षी हा उपक्रम केला. सुमारे तीन किलोमीटर परिसरात रोषणाई करण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त बाजारपेठांमध्ये उत्साह निर्माण करणे आणि पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. नवल किशोर राम म्हणाले, “पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. पारंपरिक बाजारपेठांचे महत्त्व आजही कायम आहे. युरोपसारख्या ठिकाणीही लोकांना केवळ मॉलमध्ये खरेदी करण्यापेक्षा शहरातील गल्ल्यांमधून फिरणे, सुंदर ठिकाणे पाहणे, खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे आणि चांगल्या दुकानांतून खरेदी करणे आवडते. पुण्यातही अशा संस्कृतीला वाव आहे. अशा अनुभवांसाठी पुणे अनुकूल वातावरण देणारे शहर आहे.” ते पुढे म्हणाले की, पुण्यात गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात. दिवाळीलाही विशेष महत्त्व आहे. बाजारपेठांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी व्यापारी संघटनांनी एकत्र येऊन केलेली रोषणाई शहराच्या उत्सवी वातावरणात भर घालते. शहरावर संकट आले किंवा मदतीची गरज निर्माण झाली, तरी व्यापारी सहकार्य करतात. युनायटेड रिटेल ट्रेड गारमेंट असोसिएशनचे सचिव मिलिंद शालगर म्हणाले, “पुण्याला सांस्कृतिक परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. या परंपरेच्या जतनात व्यापारीही सहभागी होतात. दिवाळीनिमित्त बाजारपेठांमधील उत्साह वाढावा आणि नागरिकांना खरेदीचा आनंददायी अनुभव मिळावा, या उद्देशाने व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन दरवर्षी रोषणाई करण्याचा निर्णय घेतला. अशा उपक्रमाची सुरुवात करण्याचा मान पुण्याला मिळाला असून, आता इतर शहरांमध्येही त्याचे अनुकरण होत आहे.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *