![]()
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद सुधाकर ओंभासे यांच्याविरुद्ध लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी 3 वाजता त्यांना तपासासाठी ताब्यात घेतले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे घटकाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील देखभाल-दुरुस्ती आणि नवीन पाइपलाइन टाकण्याची पाच कामे निविदांद्वारे घेतली होती. या कामांची एकूण किंमत 91 लाख 57 हजार 68 रुपये होती. कामांचे कार्यादेश मिळवण्यासाठी महापालिकेशी करार करणे आवश्यक होते. तक्रारदाराने कंपनीच्या वतीने करारांवर सह्या करून अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता यांच्या सह्यांसाठी कागदपत्रे महापालिकेत जमा केली होती. करारांवर सह्या करण्यासाठी अधीक्षक अभियंता अजय सूर्यवंशी यांनी निविदा रकमेच्या अर्धा टक्का, म्हणजे 45 हजार 785 रुपये मागितल्याचा आरोप तक्रारीत आहे. यानंतर पाचपैकी तीन निविदांच्या फाइलवर सह्या करून त्या मुख्य अभियंता ओंभासे यांच्याकडे पाठवण्यात आल्या. फाइल प्रलंबित असल्याने तक्रारदाराने ओंभासे यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनीही पाच करारांवर सह्या करण्यासाठी 45 हजार 785 रुपये मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाने त्याच दिवशी केलेल्या पडताळणीत ओंभासे यांनी त्यांच्या टेबलावरील तीन फाइलमधील 38 लाख रुपयांच्या निविदा रकमेच्या अर्धा टक्का, म्हणजे 19 हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगितले. यापूर्वीही तक्रारदाराकडून लाच घेतल्याचे ओंभासे यांनी मान्य केल्याचा विभागाचा दावा आहे. या प्रकरणी संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
Source link
करारनाम्यांवर सहीसाठी मुख्य अभियंत्याने लाच मागितल्याचा आरोप:पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रमोद ओंभासे ताब्यात; 19 हजारांची मागणी केल्याचा ACBचा दावा