![]()
राज्यात सध्या निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अशा कठीण प्रसंगात पीक कर्जाचे पुनर्गठन व नूतनीकरण करताना बँकांकडून शेतकऱ्यांची होणारी हेळसांड व आर्थिक लूट तात्काळ थांबवावी, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या हजारो शेतकऱ्यांनी पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी बँकांकडे अर्ज केले आहेत. मात्र, हे अर्ज मंजूर करताना बँकांकडून विविध कागदपत्रे व जाचक अटी लादल्या जात आहेत. विशेषतः ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच पीक कर्ज घेतले आहे आणि आता केवळ कर्जाचे नूतनीकरण करू इच्छितात, त्यांच्याकडूनही सातबारा उताऱ्यावरील फेरफार नकलांची अनावश्यक मागणी केली जात आहे. या नकला मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयांचे वारंवार फेरे मारावे लागत आहेत. तहसील कार्यालयांत पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे शेतकरी आणि कर्मचारी दोघेही त्रस्त असून, प्रत्येक कागदासाठी शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागत असल्याच्या तक्रारी सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून प्राप्त झाल्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी पत्रात स्पष्ट केले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. बँकांना आदेश देण्यात यावेत सिल्लोड-सोयगाव मतदारसंघासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व बँकांना यासंदर्भात तात्काळ स्पष्ट निर्देश देण्यात यावेत. जुन्या कर्जदारांकडून सातबारा फेरफार नकलांची नाहक मागणी करू नये आणि इतर जाचक अटी लादल्या जाऊ नयेत, असा आग्रह त्यांनी धरला आहे. शेतकऱ्यांची नाहक धावपळ थांबवून त्यांना कर्ज प्रक्रियेत सुलभता व मोठा दिलासा देण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणेने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा आमदार सत्तार यांनी व्यक्त केली आहे.
Source link
पीक कर्जाचे पुनर्गठन, नूतनीकरण करताना शेतकऱ्यांची लूट थांबवावी:आमदार अब्दुल सत्तार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी