Headlines

मुलीकडे जाणाऱ्या शिक्षकाचा उसाच्या ट्रकखाली चिरडून मृत्यू:बैलगाडीचा धक्का, बारामती कारखान्यासमोर घटना




सासेगाव येथे विवाहित मुलीच्या भेटीस जाणाऱ्या एका शिक्षकाचा उसाच्या ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बारामती ॲग्रो कारखान्यासमोर घडली. भानुदास एकनाथ नागरे (४५, मूळ रा. निंभोरा, ता. कन्नड) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. भानुदास नागरे हे जिल्हा परिषद शाळा खातखेडा येथे कार्यरत होते. शुक्रवारी सायंकाळी ते दुचाकीने (एमएच २० जीएच ५८३२) सासेगाव येथे मुलीला भेटण्यास व पत्नी संगीता यांना आणण्यासाठी निघाले होते. कारखान्यासमोर उसाचा ट्रक (एमएच २० डीई ९३८२) ओव्हरटेक करताना समोरून उसाच्या बैलगाडीतील बैलाचा धक्का लागल्याने त्यांचा तोल गेला. त्यामुळे ते ट्रकच्या चाकाखाली येऊन चिरडले गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. कन्नड ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. तपास सहायक पोलिस निरीक्षक सतीश दिंडे करत आहेत. मृत नागरे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई असा परिवार आहे. ज्या ट्रकने चिरडले ती शिक्षकाच्या गावातलीच गळीत हंगाम सुरू झाल्याने कन्नड बायपास व कारखाना परिसरात अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. वेगमर्यादेची अंमलबजावणी व वाहतूक नियंत्रण करण्याची मागणी होत आहे. मृत शिक्षक भानुदास नागरे यांचा ज्या ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला तो ट्रक हा त्यांच्या निंभोरा गावातीलच एका व्यक्तीच्या मालकीचा आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *