![]()
विधान परिषदेतील ३ जागांवर पराभवानंतर भाजप-शिवसेना (शिंदे) युतीच्या नेत्यांत गुरुवारी सुरू झालेल्या महायुद्धाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारीही भाजप प्रवक्ते नवनाथ बन, शिवसेनेचे पुणे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांच्यात तिखट वार-प्रतिवार झालेच. या नेत्यांनी एकमेकांना माकड, कुत्रा, डायनासोर म्हणण्यापर्यंत मजल गाठली. त्यात भाजप नेते, मंत्री आशिष शेलार आणि उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या एकाच मंचावर येऊन केलेल्या टोलेबाजीची भर पडली. आशिष शेलार-राऊत यांच्या वक्तव्यात तर राजकीय समीकरण बदलण्याचाही सूर दिसला. दरम्यान, दुष्काळग्रस्तांच्या मदतीकडे लक्ष द्या, अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धंगेकरांना केली आहे. शेलार यांनीही महायुतीत कुठलाही मनभेद नाही, हा वाद नसून उद्या होणाऱ्या सुसंवादाची पायाभरणी आहे, असा दावा केला. राऊत-शेलार यांच्या वक्तव्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, राज्याच्या हितासाठी फडणवीस-ठाकरे एकत्र येत असतील तर आनंदच आहे. कोण काय म्हणाले… नवनाथ बन (सोशल मीडियावर धंगेकरांचे सरड्याच्या रूपातील चित्र पोस्ट करत) : १२ पक्षांमध्ये फिरून आता शिवसेनेत प्रवेश केलेला हा माकडछाप व्यक्ती आमच्यावर खालच्या भाषेत टीका करत आहे. रवींद्र धंगेकर (बन यांना कुत्र्याच्या रूपात दाखवणारे चित्र पोस्ट करत) : मानवाची निर्मितीच माकडापासून झाली. तो (बन) आता डायनासोरसारखा बोलतोय. संजय राऊत (एका कार्यक्रमात) : राजकारण, बहुमत पाऱ्यासारखे चंचल असते, पुढे काय वाढून ठेवले आहे हे आज सांगता येत नाही. आशिष शेलार (त्याच कार्यक्रमात) : दाऊदसोबत बसणार नाही, पण राऊतांसोबत नक्की बसेन!
Source link
युतीच्या महायुद्धात दाऊद-राऊत,माकड, कुत्रा, सरडा, डायनासोरही:दुष्काळग्रस्तांच्या मदतीकडे लक्ष द्या, शिंदेंची धंगेकरांना सूचना