![]()
येथील कृष्णाजी माऊली जनता इंग्लिश स्कूल तथा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘दिव्य मराठी’च्या ‘सार्थक दीपावली’ या सामाजिक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. १ हजार ३३० विद्यार्थी आणि ५४ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पर्यावरणपूरक व प्रदूषणरहित दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष अनिल बोरसे होते. प्रमुख पाहुणे म्हणून दक्षता समितीचे अध्यक्ष महेश शेवाळे आणि स्कूल कमिटी सदस्य प्रकाश शेवाळे उपस्थित होते. मुख्याध्यापक व्ही. पी. शेवाळे यांनी दीपावलीचे सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व विशद केले.”दिवाळी हा केवळ रोषणाईचा किंवा फटाक्यांचा सण नसून तो मनामनांतील अंधकार दूर करून प्रेम, बंधुभाव आणि एकतेचा संदेश देणारा दीपोत्सव आहे, असे ते म्हणाले. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वायू आणि ध्वनिप्रदूषण वाढत असल्याचे मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले. यामुळे पर्यावरणाची हानी होत असून पुढील पिढीचे आरोग्य आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. “फटाकेमुक्त आणि रोषणाईयुक्त दिवाळी साजरी करून आनंदाची नवी पहाट अनुभवा,” असे आवाहन प्रमुख पाहुण्यांनी केले. या वेळी ज्येष्ठ शिक्षक एस. ए. गावित, पी. डी. गोसावी, एस. आर. शेवाळे, यू. व्ही. गरुड, एन. के. शेवाळे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची यावेळी उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या सामूहिक संकल्पामुळे विद्यालय परिसरात पर्यावरण संवर्धनाचा विचार अधोरेखित झाला. विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागाने फटाक्यांचा वापर टाळणे, प्रदूषण कमी करणे आणि निसर्गपूरक पद्धतीने सण साजरा करणे याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
Source link
1,330 विद्यार्थ्यांकडून फटाकेमुक्त दिवाळीची शपथ:जायखेड्यातील कृष्णाजी माऊली विद्यालयामध्ये उपक्रम, 54 शिक्षकांचाही सहभाग