![]()
भीमाशंकर आणि कर्जतच्या साय डोंगररांगांमध्ये प्रस्तावित असलेल्या ‘टोरेंट ग्रीन एनर्जी’ प्रकल्पासाठी तब्बल 33 हजार झाडांची कत्तल केली जाणार असून, यापैकी हजारो झाडे आधीच तोडण्यात आली आहेत. या प्रचंड वृक्षतोडीला स्थानिक नागरिक आणि प्रमुख विरोधी पक्षांनी तीव्र विरोध दर्शवत हा प्रकल्प होऊ न देण्याची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, आता स्थानिक भाजपनेही या प्रकरणात उडी घेतली असून, विकासाला आपला विरोध नसला तरी झाडे तोडण्याऐवजी चीनच्या धर्तीवर या वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात यावे, अशी मागणी कर्जतचे भाजप विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांनी केली आहे, तसेच यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. रायगडच्या कर्जत तालुक्यातील साई डोंगररांगांमध्ये प्रस्तावित असलेल्या टोरंट कंपनीच्या तीन हजार मेगावॅट जलविद्युत प्रकल्पासाठी होणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीला आता सर्वच स्तरांतून विरोध होत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि महायुतीतील स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यापूर्वीच घटनास्थळी जाऊन आपला विरोध नोंदवला आहे. यानंतर आता कर्जतचे भाजप विधानसभा प्रमुख किरण ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली असून, सदर ग्रीन एनर्जी प्रकल्पातून होणाऱ्या विकासाला आपला विरोध नसला तरी, मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोड ही चिंतेची बाब आहे; त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान टाळूनच हा विकास साधला जावा, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. किरण ठाकरे म्हणाले की, अमेरिका, जपान आणि चीन यांसारख्या देशांमध्ये झाडे तोडण्याऐवजी ती मुळासकट काढून दुसऱ्या ठिकाणी पुनर्रोपित करण्याचे प्रयोग केले जातात. त्यानंतर चार वर्षे पाणी, आवश्यक औषधोपचार आणि तज्ज्ञांच्या मदतीने या झाडांचे संगोपन केले जाते. अशाच पद्धतीचा अवलंब कर्जतमध्येही करण्यात यावा, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे. टोरेंट प्रकल्पाच्या वृक्षतोडीवरून सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद कर्जत-भीमाशंकर येथील साय डोंगररांगांमध्ये टोरेंट प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीवरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पाला आणि सरकारच्या निर्णयाला स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शवला असतानाच, आता स्थानिक सत्ताधाऱ्यांमध्येही यावरून उघड मतभेद पाहायला मिळत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे यांनी याला कडाडून विरोध केला आहे. ‘स्थानिक मेले तरी चालतील, पण असे प्रकल्प येऊ द्या’, अशी थोरवे यांची भूमिका असल्याचा घणाघात घारे यांनी केला आहे. दरम्यान, या वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता स्थानिक भाजप नेत्यांनीही या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Source link
झाडे तोडण्याऐवजी त्यांचे पुनर्रोपण करा:टोरेंट प्रकल्पाबाबत भाजप नेत्याची मागणी; पर्यावरणपूरक विकास साधण्याचे किरण ठाकरेंचे आवाहन