![]()
पुण्यातील कार्यक्रमात सिटी कॉर्पोरेशन लि.चे अनिरुद्ध देशपांडे यांनी तरुणांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) अति अवलंबून न राहता व्यवसायात जोखीम स्वीकारावी, असे मत मांडले. व्यवसाय वाढवण्यासाठी नेटवर्किंग महत्त्वाचे असून, त्याचा अर्थ केवळ व्हिजिटिंग कार्डची देवाणघेवाण नसून परस्परांशी नातेसंबंध निर्माण करणे आहे, असेही ते म्हणाले. शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान (युवा) च्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त हा सोहळा झाला. अभिनेता गश्मीर महाजनी यांना सृजन आर्ट गॅलरी पुरस्कृत सृजन युवा कलाकार पुरस्कार, तर युटोपियन शुगर्स लि.चे संचालक उमेश परिचारक यांना स्व. चंद्रकांत जोशी स्मृतिप्रित्यर्थ युवा उद्योजक पुरस्कार देण्यात आला. टिळक स्मारक मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संस्थेचे कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी, कार्यवाह श्रीकांत जोशी, डॉ. चैतन्य सराफ, विवेक मेढेकर, अजय कुलकर्णी, प्रतिभा संगमनेरकर, अपूर्वा देवगावकर, मंजुषा वैद्य, हर्षल लेले, उपेंद्र केळकर आणि सचिन पंडित उपस्थित होते. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र आणि पुणेरी पगडी असे होते. परिचारक म्हणाले, देशाची लोकसंख्या १४० कोटींवर पोहोचली आहे; मात्र त्या प्रमाणात शेती वाढलेली नाही. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान आणि ऑटोमेशनचा वापर करून शेती करणे गरजेचे आहे. शेती हा अशिक्षितांचा नव्हे, तर सुशिक्षितांचा व्यवसाय आहे. भविष्यातही शेती प्रमुख व्यवसाय राहील आणि देशाची भूक शेतकरीच भागवू शकतो, असे ते म्हणाले. महाजनी म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अपयश स्वीकारण्याची तयारी हवी. सुरुवातीलाच दहा-पंधरा टक्के अपयशाने घाबरणारा उद्योजक होऊ शकत नाही. अपयश माणसाला प्रगल्भ करते, असे त्यांनी सांगितले. बँक बॅलन्स किंवा गुंतवणुकीपेक्षा किती कुटुंबांना अर्थार्जनाची संधी दिली, हे आपल्यासाठी अधिक महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमात पुरस्कार वितरणासोबत दोन्ही पुरस्कारार्थींच्या यशस्वी प्रवासावर आधारित प्रकट मुलाखत झाली. ब्राह्मण उद्योजकांना एकत्र आणणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता. संस्थेच्या युवा कार्यकारिणीने सोहळ्याचे आयोजन केले. आयटी क्षेत्रात काम करणारे भारतीय जोडपे समीर आणि अनुराधा पळनीटकर यांनी अमेरिकेत ५ हजारहून अधिक किमी सायकल प्रवास केला. त्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
Source link
तरुणांनी व्यवसायात जोखीम स्वीकारावी:अनिरुद्ध देशपांडे यांचे मत; गश्मीर महाजनी आणि उमेश परिचारक यांना युवा पुरस्कार