Headlines

शेतकऱ्यांना त्रास दिल्यास मायक्रो फायनान्स कंपन्यांना आडवे करू:एकनाथ शिंदेंचा नांदेडमधून थेट इशारा




राज्यातील शेतकरी सध्या दुष्काळ, अतिवृष्टी आणि आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. शेतीतील नुकसान, पिकांचे घटलेले उत्पन्न आणि वाढता आर्थिक ताण यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत कर्जवसुलीसाठी काही मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. याच मुद्द्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेडमधील कार्यक्रमातून मायक्रो फायनान्स कंपन्यांना थेट इशारा दिला आहे. शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नका, अन्यथा अशा कंपन्यांना आडवे करू, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात विकासकामांसोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळी परिस्थिती आणि राज्य सरकारच्या मदतकार्यावर शिंदे यांनी भाष्य केले. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार; 5 हजारांची अग्रीम मदत राज्यात यंदा दुष्काळाचे सावट असल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती चिंताजनक बनली आहे. काही भागांत पावसाअभावी पिकांचे नुकसान झाले, तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. या संकटाच्या काळात सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत देण्याची मागणी केली होती. त्यानंतर मंत्रालयात बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि मदतीबाबत निर्णय घेण्यात आला. दुष्काळग्रस्त भागातील पात्र शेतकऱ्यांना 5 हजार रुपयांची अग्रीम मदत थेट बँक खात्यात जमा करण्यात आली असून या निर्णयाला मंत्रिमंडळाची मान्यताही देण्यात आली आहे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना एकटे सोडणार नाही. सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. दुष्काळ असो किंवा अतिवृष्टी, शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी चारा आणि पाणीपुरवठ्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचाही उल्लेख त्यांनी केला. मायक्रो फायनान्स कंपन्यांना कठोर कारवाईचा इशारा शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींचा फायदा घेऊन कर्जवसुलीसाठी त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याच्या प्रकारांवर एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांना वसुलीसाठी त्रास दिला जात असेल, तर ते सहन केले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांनी कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये. संकटाच्या काळात सरकार त्यांच्या मदतीसाठी उभे आहे. मात्र, मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी वसुलीसाठी शेतकऱ्यांना धमकावणे किंवा त्यांच्यावर दबाव टाकणे चुकीचे आहे. अशा प्रकारे त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर यापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही. शेतकऱ्यांना त्रास देणे थांबवा, अन्यथा मायक्रो फायनान्स कंपन्यांना आडवे करू, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. त्यामुळे कर्जवसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांवर दबाव टाकणाऱ्या कंपन्यांना सरकारचा कठोर संदेश असल्याचे मानले जात आहे. मुलींच्या विवाहासाठी सामूहिक विवाह मेळावे घेणार शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबांच्या आर्थिक अडचणींचा विचार करून सरकार विविध उपक्रम राबवत असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठी सामूहिक विवाह मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आर्थिक परिस्थितीमुळे मुलींच्या लग्नाचा खर्च पेलताना कुटुंबांना अडचणी येतात. अशा कुटुंबांना दिलासा देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी सूचित केले. विकासकामांमध्ये राजकारण नको; विरोधकांनाही सुनावले नांदेडमधील विकासकामांच्या उद्घाटनावरून बोलताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांनाही लक्ष्य केले. काही जण रात्री येऊन उद्घाटन करतात, त्यांनी दिवसा येऊन कामे करावीत, असा टोला त्यांनी लगावला. विकासकामांच्या बाबतीत राजकारण करण्यापेक्षा नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. सध्या शेतकरी संकटात असून त्यांना मदत करण्याची ही वेळ आहे. त्यामुळे विकासकामांमध्ये राजकारण न करता जनतेच्या हितासाठी काम केले पाहिजे, असे ते म्हणाले. नांदेडमधील कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असल्याचे नमूद करत त्यांनी या भागाचे कष्टकरी भूमी म्हणून वर्णन केले. ही लाडक्या बहिणींची आणि लाडक्या भावांची भूमी आहे, असे सांगत स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले. आमदार बालाजी कल्याणकर हे सातत्याने विकासकामांचे प्रस्ताव घेऊन येतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे विविध कामांना गती मिळाल्याचे शिंदे म्हणाले. आरोग्य सुविधांसाठी निधी, जनतेपर्यंत योजना पोहोचवण्यावर भर कार्यक्रमात आरोग्य विभागाच्या कामांचाही उल्लेख करण्यात आला. आरोग्य सुविधांच्या विकासासाठी सरकारकडून सुमारे 3,500 कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. आरोग्य विभागाची जबाबदारी सांभाळली असताना नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले. आता आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य संवाद यात्रा सुरू केली आहे. सरकारी योजनांची माहिती आणि त्यांचे लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. सरकारने घेतलेले निर्णय केवळ कागदावर न राहता त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे. आरोग्य सुविधांच्या बाबतीत नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही यावेळी शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरूनही विरोधकांना प्रत्युत्तर दिले. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जात आहेत. मात्र, विरोधकांकडून ही योजना बंद पडेल, अशा प्रकारची टीका केली जात आहे. कोणत्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. कितीही विरोध झाला तरी सरकार ही योजना सुरू ठेवणार आहे. विरोधकांच्या आरोपांना आम्ही भाषणातून नव्हे, तर कामातून उत्तर देऊ, असे शिंदे म्हणाले. एकीकडे शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत, तर दुसरीकडे कर्जवसुलीच्या नावाखाली त्रास देणाऱ्या फायनान्स कंपन्यांवर कारवाईचा इशारा आणि लाडकी बहीण योजनेबाबतची भूमिका, अशा विविध मुद्द्यांवर एकनाथ शिंदे यांनी नांदेडमधील कार्यक्रमात भाष्य केले. शेवटी त्यांनी उपस्थित नागरिकांना आगामी दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. हेही वाचा… कण्हेरमध्ये प्रेमसंबंधाच्या वादातून तरुणावर गोळीबार:लग्न करण्याच्या निर्णयावरून दोघांमध्ये वाद, बंदूक काढून थेट झाडली गोळी प्रेमसंबंध आणि लग्नाच्या विषयावरून सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान थेट गोळीबारात झाल्याची धक्कादायक घटना सातारा तालुक्यातील कण्हेर येथे घडली आहे. प्रेयसीसोबतचे प्रेमसंबंध संपविण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर बंदुकीतून गोळी झाडली. शनिवारी रात्री कण्हेर गावाशेजारील वेळे-कामठी रस्त्यालगत असलेल्या आय.बी. क्रिकेट मैदानावर हा थरारक प्रकार घडला. या घटनेत विजय वाघमळे हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणातील संशयित आरोपी नितीन बबन साबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई सुरू आहे. या घटनेमुळे कण्हेर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *