![]()
वर्गातील अध्यापनापासून विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीपर्यंत. पारंपरिक शिक्षणपद्धतीपासून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरापर्यंत… बदलत्या शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शिक्षकांनीही अध्यापनाच्या पद्धती बदलण्याची गरज आहे. याच बदलांचा वेध घेत राजूर केंद्राच्या शिक्षण परिषदेत शिक्षकांनी गुणवत्तावाढीच्या विविध पैलूंवर मंथन केले. विद्यार्थ्यांची मूलभूत साक्षरता, संख्याज्ञान, इंग्रजी वाचन-लेखन, नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अशा विषयांवरील मार्गदर्शनातून आगामी शैक्षणिक कामकाजाची दिशा निश्चित करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडोळवाडी येथे शुक्रवारी ही केंद्रस्तरीय शिक्षण परिषद पार पडली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णकांत कनवारिया, डायटच्या प्राचार्या डॉ. सान्वी देशमुख, माध्यमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात, प्राथमिक शिक्षणाधिकारी संगीता भागवत, गटशिक्षणाधिकारी गजानन वाळके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिषद आयोजित करण्यात आली. परिषदेच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख श्रीकृष्ण निहाळ होते. प्रारंभी नवनियुक्त विस्तार अधिकारी पालोदकर, गव्हाणे यांचे स्वागत करण्यात आले. या परिषदेत विष्णू गवळी यांनी सुधारित मूल्यमापन पद्धतीवर मार्गदर्शन केले. मनोज कणखर यांनी मूलभूत साक्षरता व संख्याज्ञानावर मार्गदर्शन केले. सारिका पिंपळे यांनी विद्यार्थिनिहाय अध्ययन निष्पत्ती नियोजनावर मार्गदर्शन केले. अल्ताफ शेख यांनी शिक्षणातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर माहिती दिली. मुख्याध्यापक सुभाष तळेकर यांनी शाळा व्यवस्थापन समिती, लोकसहभाग याविषयी मार्गदर्शन केले. रामेश्वर खंडागळे यांनी ‘वी लर्न इंग्लिश’ उपक्रमाचे सादरीकरण केले. माजी केंद्रप्रमुख आर. व्ही. पुंगळे यांनी प्रशासकीय कामकाजाविषयी माहिती दिली. परिषदेचे अध्यक्ष निहाळ यांनी केंद्रातील शाळांमध्ये सुरू असलेल्या नवोदय तयारी, इंग्रजी वाचन-लेखन सुधारणा उपक्रमांचे कौतुक केले. या उपक्रमांमुळे विद्यार्थी आत्मविश्वासाने इंग्रजी बोलत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. यजमान शाळेचे मुख्याध्यापक भगवान घायाळ, सहशिक्षक संजय बेदमुथा, शाळा व्यवस्थापन समितीने परिषदेचे नियोजन केले. डॉ. प्रफुल्लता भिंगोले, राजेंद्र निहाळ, भास्कर घुगे, भगवान तांबेकर, विष्णू गवळी, रामेश्वर खंडागळे यांनी सहकार्य केले. ऑनलाइन वर्गातून नवोदय, शिष्यवृत्तीची तयारी : राजूर केंद्राचा विशेष उपक्रम म्हणून विद्यार्थ्यांसाठी नियमित मोफत ऑनलाइन नवोदय व शिष्यवृत्ती वर्ग घेणारे भगवान तांबेकर आणि महाजन यांचे अभिनंदन करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अतिरिक्त मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाची परिषदेत विशेष दखल घेण्यात आली. पडोळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित शिक्षण परिषदेत मार्गदर्शन करताना मान्यवर.
Source link
पुस्तकापासून एआयपर्यंत शिक्षणाची झेप:शिक्षकांच्या मंथनातून गुणवत्तावाढीचा ध्यास, एआयपासून नवोदयच्या तयारीपर्यंत शिक्षकांना नवे धडे