![]()
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने प्रतिटन ३ हजार १५० रुपये, तर गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने ३,१०१ रुपये पहिली उचल जाहीर केली. त्यामुळे संघर्ष समितीने आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. दरम्यान, रविवारी गुरसाळे येथील विठ्ठल कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर ऊस तोडणी व वाहतूकदारांसह काही शेतकऱ्यांनी संघर्ष समितीच्या विरोधात प्रतिआंदोलन करत रास्ता रोको केला. यामुळे पंढरपूर-टेंभुर्णी मार्गावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उसाला प्रतिटन ५००० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी ऊसदर संघर्ष समितीच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील पाच साखर कारखान्यांच्या गव्हाणीत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले होते. या आंदोलनामुळे कारखान्यांचे गाळप ठप्प झाले होते. मात्र, कारखाना प्रशासनाकडून दराबाबत ठोस निर्णय घेतला जात नसल्याने आंदोलन चिघळत चालले होते. आंदोलक, कारखाना प्रशासन, ऊस वाहतूकदार आणि शेतकरी यांच्यात वारंवार वादाचे प्रसंग घडत होते. अद्याप अनेक कारखान्यांनी ऊस दर जाहीर केलेला नाही. तरी गाळप सुरूच आहे. त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाल्या. आंदोलनाचे लोण वाढत असताना दर जाहीर केल्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित केले. रविवारी सकाळपर्यंत गव्हाणत उतरूण संघर्ष समितीचे आंदोलन सुरू होते. तर दुसरीकडे रविवारी टेंभुर्णी मार्गावर प्रतिआंदोलन करताना उत्पादक, वाहन चालक. गुरसाळे येथील विठ्ठल कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर रविवारी ऊस तोडणी व वाहतूकदारांनी तसेच शेकडो शेतकऱ्यांनी संघर्ष समितीच्या आंदोलनाविरोधात भूमिका घेतली. वाहनांमध्ये आणि शेतात तोडून ठेवलेला ऊस वाळत असल्याने मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा करत त्यांनी पंढरपूर-टेंभुर्णी मार्गावर रास्ता रोको केला. ऊसदर संघर्ष समितीचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली. आंदोलनामुळे गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी, करकंब येथील विठ्ठलराव शिंदे युनिट क्रमांक २, खर्डी येथील सीताराम शुगर, भाळवणी येथील सहकार शिरोमणी आणि श्रीपूर येथील पांडुरंग शुगर या कारखान्यांचे गाळप बंद होते. त्यामुळे कारखाना कार्यस्थळांवर उसाने भरलेली शेकडो वाहने उभी होती, तोडून ठेवलेला हजारो टन ऊस गाळपाअभावी पडून होता. रविवारी उचलीबाबत तोडगा निघाला. दुपारनंतर गाळप सुरू झाले. संघर्ष समितीच्या आंदोलनाच्या विरोधातच काही शेतकरी आणि वाहनधारकांनी प्रतिआंदोलन करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा दावा स्वाभिमानीचे नेते सचिन पाटील यांनी केला. आंदोलनाविरोधात शेतकरी आणि वाहतूकदारांना उभे करण्याचा प्रकार काळा दिवस ठरेल, अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
Source link
चार दिवसांनंतर गाळप सुरू:ऊस दरावर अखेर तोडगा; "विठ्ठलराव शिंदे''ची 3150, विठ्ठलची 3101 पहिली उचल