![]()
रचना ट्रस्ट संचलित आश्रमशाळा, धोंडेगाव येथील आठ विद्यार्थ्यांनी हरसूल येथील बिरसा मुंडा चौकात दिवाळी साहित्याचा स्टॉल लावून ५,४०० रुपयांची विक्री केली. वस्तूंची निर्मिती, त्यांचा खर्च, विक्री आणि नफा यांचे गणित समजून घेत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष बाजारपेठेचा अनुभव घेतला. आयबीटी उपक्रमांतर्गत इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच व्यावहारिक व व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. आयबीटी निदर्शक गणेश बागुल, जयप्रकाश पगार व तानाजी मेंगाळ यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक वसंत एकबोटे यांनी विद्यार्थ्यांकडून दिवाळीसाठी लागणाऱ्या विविध वस्तू शाळेत तयार करून घेतल्या. या वस्तूंचा खर्च, लागणारा वेळ आणि त्यातून मिळणारा नफा यांचे गणित समजावे, यासाठी आश्रमशाळेने दिवाळी स्टॉलचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनी वस्तूंची माहिती आणि त्यांचे महत्त्व ग्राहकांना समजावून सांगत विक्री केली. या स्टॉलला विविध शाळांतील शिक्षक, विद्यार्थी, प्रतिष्ठित व्यापारी आणि मान्यवरांनी भेट देऊन साहित्य खरेदी केले व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या उपक्रमासाठी प्राथमिक मुख्याध्यापक मिलिंद चौथे, माध्यमिक मुख्याध्यापक सुनील जाधव, तानाजी मेंगाळ यांच्यासह पालकांनी परिश्रम घेतले. रांगोळी, शिराई (केरसणी), आकाशकंदील, बोळकी, दिवे, चिवडाशेव, नागलीचे लाडू आणि उटणे आदी साहित्य विक्री केले. व्यावसायिक ज्ञानासोबतच वस्तूंचे मूल्य ठरवणे व विक्रीचे व्यवस्थापन यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा, यासाठी हरसूल बाजारपेठेत हा उपक्रम राबवला. – मिलिंद चौथे, मुख्याध्यापक
Source link
हरसूलमध्ये विद्यार्थ्यांनी थाटला दिवाळी स्टॉल; विक्रीतून कमावले 5,400 रुपये:धाेंडेगाव आश्रमशाळेत घेतले वस्तू बनवण्यापासून विक्रीपर्यंत व्यवसायाचे धडे