Headlines

500-600 रुपये देऊन भाड्याची माणसं आणली:भाजपचा मोर्चा म्हणजे लोकशाहीची क्रूर थट्टा, आमदार महेश सावंत यांचा हल्लाबोल, BMC कारभारावरूनही फटकारले




“गेली 12 ते 13 वर्षे केंद्रात सत्ता उपभोगणाऱ्या भाजपला आता अचानक कसली लोकशाही वाचवायची आहे? 13 वर्षांपूर्वी हिंदू कधी धोक्यात नव्हता, मात्र आता पराभवाच्या भीतीने सतत ‘हिंदू खतरे में’ असा खोटा आक्रोश करून जनतेला भुलवण्याचे काम सुरू आहे. काल मुंबईत काढलेल्या मोर्चात शिवाजी पार्कचा एकही स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरला नाही; केवळ 200 ते 500-600 रुपये देऊन भाड्याने माणसे गोळा केली होती. राष्ट्रगीत सुरू होण्याआधीच लोक जेवणावर तुटून पडले, यावरूनच भाजपचा हा मोर्चा किती मोठा ढोंग होता हे उघड झाले आहे,” अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार महेश सावंत यांनी भाजप आणि महायुतीवर तोफ डागली. माध्यमांशी संवाद साधताना आमदार सावंत यांनी भाजपच्या ‘लोकशाही बचाओ’ मोर्चाची खिल्ली उडवतानाच, मुंबई महापालिकेतील अमित साटम यांचा वाढता हस्तक्षेप, दिया मिर्झा वाद, ठाण्यातील प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण, पदवीधर निवडणुकीचे निकाल आणि दिशा सालियन प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकारणाचा जोरदार पंचनामा केला. 500-600 रुपये देऊन माणसे आणली भाजपच्या ‘लोकशाही बचाओ, अराजकता हटाओ’ मोर्चाचा बुरखा फाडताना महेश सावंत म्हणाले, “भाजपच्या कालच्या मोर्चातील उत्साह पूर्णपणे कृत्रिम होता. उपस्थित गर्दीमध्ये निम्मे कार्यकर्ते भाजप व शिंदे गटाचे असतील, परंतु उरलेली निम्मी गर्दी ही 200 ते 500-600 रुपये देऊन भाड्याने आणलेली होती. देशातील जनता भाजप आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरोधात उभी ठाकली आहे.” “आज विरोधकांवर फेक नरेटिव्हचा आरोप करणाऱ्या भाजपने २०१४ च्या आधी स्वतः खोटे नरेटिव्ह पसरवून सत्ता मिळवली होती. महागाई, बेरोजगारी कमी करण्याचे आणि अच्छे दिन आणण्याचे खोटे स्वप्न दाखवले गेले. काँग्रेसच्या काळात एलपीजी सिलिंडरचे दर ७५ पैसे किंवा १ रुपयाने वाढले तरी स्मृती इराणी रस्त्यावर डोक्यावर सिलिंडर घेऊन नाचत होत्या; आज गॅसचे भाव कुठे गेलेत?” ठाण्यात दिवसाढवळ्या खून पडतोय, आधी ठाणेकरांचे अश्रू पुसा! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस आणि लोकशाहीच्या रक्षणावर लिहिलेल्या लेखाचा समाचार घेताना सावंत म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना बोलणे भागच आहे. मोदी-शहांची स्तुती करून पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडावी, यासाठी त्यांनी ही आग ओकली आहे की त्यांच्याकडून ती ओकायला लावली आहे? ठाण्यात काय परिस्थिती आहे हे आधी त्यांनी बघावे.” पुर्णेकर खून प्रकरणात पोलिसांचे दुर्लक्ष सावंत म्हणाले, “आमचे शाखाप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या झाली. या प्रकरणात पोलिसांचे काम पुर्णेकरांचा मुलगा राम करतोय; तो स्वतः सीसीटीव्ही फुटेज आणि क्लिप्स शोधून पोलीस आयुक्तांना देतोय. मुख्य सूत्रधार आणि आरोपी पोलीस ठाण्यात टी-शर्ट घालून एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यासारखे रुबाबात फिरत आहेत. ठाणेकरांचा आणि पोलीस समाजाचा आक्रोश सुरू आहे, तो आधी पुसा आणि मग विरोधकांवर बोला. खासदार नरेश म्हस्के केवळ तोंडाची वाफ दवडतात. आदित्य ठाकरेंना अटक करण्याची भाषा करणाऱ्यांनी उगाच फुशारक्या मारू नयेत; मुंबईत जन्माला आलेला प्रत्येक शिवसैनिक हा स्वतःच्या हिमतीवर उभा आहे.” अमित साटम आमदार आहेत की नगरसेवक? मुंबई महानगरपालिकेतील भाजपच्या वाढत्या हस्तक्षेपावर आमदार सावंतांनी कडक ताशेरे ओढले. “महानगरपालिकेत महापौरांना काही स्थान किंवा अधिकार उरले आहेत की नाही? आमदार अमित साटम हे आमदार आहेत की नगरसेवक, हेच समजत नाही. पालिका आयुक्तांपासून टेंडर प्रक्रियेपर्यंत साटम जोपर्यंत ग्रीन सिग्नल देत नाहीत, तोपर्यंत महापौर टेंडर उघडू शकत नाहीत. पालिकेचा संपूर्ण कारभार साटम यांच्याच इशाऱ्यावर चालत आहे.” दिया मिर्झा वादावरून ढोंगी हिंदुत्वावर बोट “दिया मिर्झा यांनी पर्यावरणपूरक दिवाळीसाठी दिलेला संदेश भाजपला हिंदुत्वविरोधी वाटतो. १९९२ च्या दंगलीत बाळासाहेब ठाकरेंच्या एका हाकेवर शिवसैनिक रस्त्यावर उतरले, तेव्हा आमची मुले गोळ्या लागून शहीद झाली; तेव्हा हा भाजप कुठे होता? केवळ सणांच्या नावावर धार्मिक तेढ आणि दंगली घडवणे हाच भाजपचा अजेंडा आहे.” बॅलेट पेपरवर निवडणूक झाली अन् पदवीधरांनी महायुतीला जागा दाखवली! विधानपरिषदेच्या निकालांवरून सत्ताधाऱ्यांच्या अहंकारावर प्रहार करताना ते म्हणाले, “5 पैकी 5 जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या महायुतीला सुशिक्षित पदवीधर आणि शिक्षकांनी त्यांची जागा दाखवून दिली. ही निवडणूक ईव्हीएमवर नव्हे, तर बॅलेट पेपरवर झाली होती. तिथे पैसे चालले नाहीत आणि महाविकास आघाडीने 3 जागा जिंकल्या तर महायुतीला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले.” पक्ष फोडले तरी जनता विरोधात “शिवसेना 75 टक्के फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, तरीही तरुण पिढी आज रस्त्यावर उतरून सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवत आहे. ज्याप्रमाणे 2014ला तरुणांनी बदल घडवला होता, त्याचप्रमाणे आगामी काळात हे सरकार बदलल्याशिवाय राहणार नाही.” मुंबईतील प्रदूषण, पाणी नियोजन आणि दिशा सालियन प्रकरण ते पुढे म्हणाले, “19 नोव्हेंबरला आंदोलनाची भाषा करणाऱ्या सीबीआय आणि भाजपला सांगावेसे वाटते की, न्यायालयाने या प्रकरणात आधीच निकाल दिलेला आहे. केवळ राजकीय फायद्यासाठी जुने विषय उकरून काढले जात आहेत. दिवाळीच्या काळात महापालिकेचे अधिकारी ‘लक्ष्मी’ गोळा करण्यात व्यस्त असल्याने रस्त्यांवरील धूळ आणि प्रदूषणाकडे कोणाचेही लक्ष नाही. सामान्य नागरिकांच्या सोसायट्यांना नोटीसा पाठवल्या जातात, मात्र मोठ्या कंत्राटदारांवर कसलाही अंकुश नाही.” धरणातील गाळ आणि पाणी नियोजन “10 नोव्हेंबर चालू झाला तरी अजून पुढील 7 ते 8 महिने पाणी पुरवायचे आहे. ऐन नोव्हेंबरमध्ये धरणातील गाळ काढल्यास पाणी गढूळ होईल. गाळ काढण्याची प्रक्रिया वैज्ञानिकदृष्ट्या मे महिन्याच्या मध्यावर केली पाहिजे. प्रशासनाने योग्य नियोजन करून मुंबईकरांना दिलासा द्यावा.” ——————————————— हेही वाचा… शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी!: 5 हजारांची अग्रीम मदत खात्यात जमा व्हायला सुरुवात; 31 हजार कोटींच्या प्रस्तावावर प्रताप सरनाईकांची मोठी माहिती राज्यात दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकरी पीक विम्याची आणि सरकारी मदतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची अग्रीम मदत सोमवारपासून देण्यास सुरुवात झाली असून, दिवाळीच्या सुट्टीनंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आणखी मोठ्या आणि भरीव मदतीची घोषणा केली जाईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *