Headlines

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यावर पत्नीसमवेत गुन्हा दाखल:वैध उत्पन्नापेक्षा 4 कोटी 37 लाख 84 हजार 930 रुपयांची अधिक मालमत्ता असल्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा दावा




कृषी विभागाचे अधिकारी किरण शामराव जाधव आणि त्यांची पत्नी संगीता किरण जाधव यांच्याविरुद्ध पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा दाखल झाला आहे. वैध उत्पन्नापेक्षा ४ कोटी ३७ लाख ८४ हजार ९३० रुपयांची अधिक मालमत्ता असल्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा दावा आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उघड चौकशीनंतर ही कारवाई केली. किरण जाधव सध्या सोलापूर येथील आत्मा प्रकल्प संचालक कार्यालयात उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी कृषी उपसंचालक, दक्षता पथक आणि तंत्र अधिकारी, गुणनियंत्रण या पदांवर काम केले आहे. विभागाच्या माहितीनुसार, जाधव यांच्या उघड चौकशीचे आदेश २ डिसेंबर २०२५ रोजी देण्यात आले. त्यानंतर ४ जून १९९४ ते २ डिसेंबर २०२५ या काळातील त्यांचे उत्पन्न आणि मालमत्तेची चौकशी करण्यात आली. या चौकशीत वैध उत्पन्नाच्या तुलनेत ४ कोटी ३७ लाख ८४ हजार ९३० रुपये, म्हणजेच १२८.७ टक्के अधिक संपत्ती आढळल्याचा विभागाचा दावा आहे. जाधव यांनी ही संपत्ती भ्रष्ट मार्गाने मिळवली आणि पत्नी संगीता यांनी त्यांना अपप्रेरणा दिली, असा आरोप करण्यात आला आहे. दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलिस अधीक्षक अजित पाटील या प्रकरणातील फिर्यादी आणि चौकशी अधिकारी आहेत. अपर पोलिस अधीक्षक अर्जुन भोसले पुढील तपास करत आहेत. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचे मार्गदर्शन आहे. भ्रष्टाचाराची माहिती किंवा लोकसेवकाने लाच मागितल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे. तक्रारीसाठी १०६४ या क्रमांकावर संपर्क साधावा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *