![]()
पुण्यातील प्रभात जनप्रतिष्ठान आणि प्रभात मित्रमंडळातर्फे आयोजित भाऊबीज कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी सुखी, सुशिक्षित आणि सन्मानित स्त्री असलेला देश खऱ्या अर्थाने प्रगत असल्याचे मत व्यक्त केले. सर्वांना सोबत घेऊन चालल्याने समाज आणि देशाची प्रगती होते, असे त्या म्हणाल्या. गुरुवार पेठेतील प्रभात जनप्रतिष्ठान आणि प्रभात मित्रमंडळातर्फे ‘आपुलकीची भाऊबीज आणि शौर्य पुरस्कार २०२६’ सोहळा महात्मा फुले पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. भागवताचार्य ह.भ.प. प्रियांका भोसले, उद्योजक कृष्णकुमार गोयल, प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर चव्हाण, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, नगरसेवक ऐश्वर्या थोरात, स्नेहा माळवदे आणि सम्राट थोरात उपस्थित होते. पेशवाई क्रिएशनचे राहुल येमूल, सचिव उदय वाडेकर, उत्सव प्रमुख नितीन घोगरे, अमोल व्यवहारे, मंगेश शिंदे, अमोल थोरात आणि हेमराज साळुंके यांचीही उपस्थिती होती. हुतात्मा जवान घनश्याम आढाळगे यांच्या कुटुंबाला शौर्य पुरस्कार देण्यात आला. त्यांचे वडील रायबा आणि आई सुनंदा आढाळगे यांनी पुरस्कार स्वीकारला. पूर्व भागातील दोनशेहून अधिक महिलांना दिवाळी साहित्य संच भाऊबीजेची ओवाळणी म्हणून देण्यात आला. अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘वसुधैव कुटुंबकम’ हा सुंदर विचार आहे. संपूर्ण भारत देश आपले घर आहे, ही भावना महत्त्वाची आहे. आपल्या कुटुंबाप्रमाणेच आजूबाजूचे लोक सुखात आणि सुरक्षित आहेत का, हेही पाहायला हवे. ‘आपुलकीची भाऊबीज’ उपक्रमातून हे काम होताना दिसते, असे त्या म्हणाल्या. प्रियांका भोसले म्हणाल्या की, आपण आपली संस्कृती विसरत चाललो आहोत. गीता, ज्ञानेश्वरी आणि रामायण आजच्या पिढीपर्यंत पोहोचलेले नाही. भारत हा संस्कृतीप्रधान देश असून धर्माचे शिक्षण महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले. कृष्णकुमार गोयल म्हणाले, भाऊबीज म्हणजे केवळ बहिणीने भावाला ओवाळणे नाही, तर एकमेकांसाठी खंबीरपणे उभे राहण्याची भावना आहे. बहिणीप्रमाणेच देशाच्या सैनिकांच्या कुटुंबांच्या आणि मातोश्रींच्या पाठीशी उभे राहण्याचे काम मंडळाने केले आहे, असे ते म्हणाले. हा सन्मान केवळ सैनिकाचा नसून भारतमातेप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेचा आणि त्यागाचा आहे. समाजात माणुसकी जिवंत असल्याने आपुलकी टिकून आहे, असे गोयल यांनी सांगितले. ———————- हेही वाचा.. विरोधकांना मुद्दे मिळत नाहीत, म्हणून ते मला टार्गेट करतात: अमृता फडणवीसांचा विरोधकांना टोला; राज ठाकरेंच्या विधानावरही स्पष्ट केले मत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांकडून सातत्याने टार्गेट केले जात असल्याच्या प्रश्नावर, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी विरोधकांना सणसणीत टोला लगावला आहे. “देवेंद्रजींवर टीका करण्यासाठी जेव्हा विरोधकांना काही मुद्दे मिळत नाहीत, तेव्हा त्यांना त्यांची बायको भेटते,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. प्रभात प्रतिष्ठान आणि किशोरजी यांच्या पुढाकाराने आयोजित एका भाऊबीजेच्या कार्यक्रमाला उपस्थित असताना अमृता फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकरी मदत, राज ठाकरेंचे मिश्किल विधान आणि महिला मुख्यमंत्री यासारख्या अनेक राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर मनमोकळी उत्तरे दिली. सविस्तर वाचा
Source link
सुखी आणि सन्मानित स्त्री असलेला देशच प्रगत होतो- अमृता फडणवीस:पुण्यात भाऊबीज कार्यक्रमात शहीद जवानाच्या कुटुंबाला शौर्य पुरस्कार